सोलापुरात सहा टक्क्यांनी मतदान वाढवा; आयोगाचे आदेश | पुढारी

सोलापुरात सहा टक्क्यांनी मतदान वाढवा; आयोगाचे आदेश

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा :  येणार्‍या लोकसभा निवडणुकीसाठी आता काही महिन्यांचाच कालावधी उरला आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने आता निवडणूक शाखा कामाला लागली आहे. लोकसभा निवडणुकीत गतवेळीपेक्षा यापुढे मतदानाचा टक्का वाढविण्याच्या सूचना निवडणूक आयोगाच्या वतीने दिल्या आहेत. गतवेळीपेक्षा यंदा किमान 6.14 टक्क्यांनी मतदान वाढविण्याची कसरत निवडणूक शाखेला करावी लागणार आहे.

या संदर्भात निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी मिलिंद शभरकर यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच एक बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी गणेश निराळी, तहसीलदार अमर वाकडे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. जिल्ह्यात लोकसभेचे दोन मतदारसंघ आहेत. त्यासाठी 2014 साली जवळपास 59.99, तर 2019 मध्ये 61.27 टक्के मतदान झाले होते. राज्यातील सरासरी मतदानाची टक्केवारी ही 67.4 टक्के होती. येणार्‍या 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी किमान 6.14 टक्के मतदान वाढविण्याच्या सूचना निवडणूक आयोगाच्यावतीने करण्यात आल्या आहेत. त्यासाठी मतदार यादीचे शुध्दीकरण करण्याचे काम हाती घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. यामध्ये दुबार असलेली नावे तातडीने वगळण्यात यावीत तसेच ज्या मुला-मुलींनी वयाची 18 वर्षे पूर्ण केली आहेत, त्यांनी तातडीने मतदार यादीमध्ये नाव नोेंदणी करावी.

त्यासाठी विशेष शिबिरांचे आयोजन करण्याच्या सूचनाही निवडणूक आयोगाच्या वतीने करण्यात आलेल्या आहेत. मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठीही विविध प्रकारचे उपक्रम हाती घेण्याच्या सूचना यावेळी करण्यात आल्या आहेत. शासनाकडून कोणत्याही क्षणी लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे निवडणुकीच्या अनुषंगाने असणारी तयारी पूर्ण करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकार्‍यांनी निवडणूक शाखेला दिल्या आहेत.

मतदार नोंदणीसाठी विशेष शिबिरे

समाजातील ज्या ज्या लोकांनी वयाची 18 वर्षे पूर्ण केलेली आहेत, त्या मंडळींनी स्वत:हून मतदार यादीमध्ये नावनोंदणी करावी. पात्र लोकांनी जास्तीत जास्त नोंदणी करावी. यासाठी निवडणूक शाखेच्या वतीने विशेष शिबिरांचे आयोजन करण्याचा सूचना निवडणूक शाखेच्या वतीने करण्यात आल्या आहेत. मतदार यादी अद्ययावत आणि बिनचूक व्हावी यासाठी दुबार आणि मयत मतदारांची नावे वगळण्यात यावीत, अशा सूचनाही करण्यात आल्या आहेत.

Back to top button