सोलापूर : दशरथ गोप ३०० समर्थकांसह शनिवारी बीआरएसमध्ये जाणार | पुढारी

सोलापूर : दशरथ गोप ३०० समर्थकांसह शनिवारी बीआरएसमध्ये जाणार

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा :  गत दोन महिन्यांपासून भारत राष्ट्र समितीच्या (बीआरएस) वाटेवर असलेले पद्मशाली शिक्षण संस्थेचे सर्वेसर्वा दशरथ गोप यांनी अखेर या पक्षात जाण्याचा निर्णय घेतला आहे. शनिवारी (दि. 8) ते सुमारे 300 समर्थकांसह हैदराबादमध्ये पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम करणार आहेत.

आजवर कुठल्याही पक्षात नसलेल्या गोप यांचे सर्वपक्षीय नेत्यांशी चांगले संबंध आहेत. शिक्षण संस्थेच्या माध्यमातून त्यांची पूर्व भागात पकड आहे. यापूर्वी त्यांना राजकीय पक्षांच्या ऑफर आल्या होत्या; मात्र त्यांनी राजकारणात न जाणेच पसंत केले होते. या पार्श्वभूमीवर तीन महिन्यांपूर्वी त्यांना बीआरएसची ऑफर आली होती. सोलापुरात बीआरएसने आयटी कंपन्या आणाव्यात, शिक्षणाची सोय करावी या दोन प्रमुख मुद्द्यांचा विचार झाला तरच आपण बीआरएसमध्ये जाणार, अशी भूमिका गोप यांनी घेतली आहे. दोन महिन्यांपूर्वी त्यांनी हैदराबादला जाऊन बीआरएसचे सर्वेसर्वा तथा तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखरराव (केसीआर) तसेच अर्थ-आरोग्य-वैद्यकीय मंत्री हरिश राव यांची भेट घेतली होती.

यानंतर गोप यांचा बीआरएस प्रवेश अपेक्षित होता; मात्र गोप यांनी अंतिम निर्णय घेतला नव्हता. गत आठवड्यात केसीआर यांनी सोलापूरचा दौरा केला. त्यावेळी परगावी असल्याने गोप यांची केसीआर यांच्यासमवेत भेट होऊ शकली नाही. मात्र केसीआर यांचा दौरा झाल्यावर गोप यांनी बीआरएसमध्ये जाण्याबद्दल विचारविनिमय सुरू केला. तीन दिवसांपूर्वी त्यांनी हैदराबादला जाऊन पुन:श्च केसीआर, हरिश राव यांची भेट घेऊन आपण बीआरएसमध्ये येणार, असे स्पष्ट केले.

या पार्श्वभूमीवर गोप यांनी मंगळवारी शिक्षण संस्थेचे पदाधिकारी, समर्थक व हितचिंतकांची भेट घेऊन चर्चा केली आणि बीआरएसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. येत्या शनिवारी (ता. 8) गोप हे 300 समर्थकांसह हैदराबादमध्ये केसीआर यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्ष प्रवेश करणार आहेत. यादृष्टीने त्यांनी जय्यत तयारी सुरू केली आहे.

पूर्व भागातील समीकरणे बदलणार

गोप यांच्या बीआरएस प्रवेशाने पूर्व भागातील राजकीय समीकरणे बदलणार आहेत. या पक्षाचे नेतृत्व त्यांना मिळणार आहे. संघटन कौशल्यासाठी प्रसिद्ध असलेले गोप हे या पक्ष़ाची सोलापुरात चांगल्या पद्धतीने उभारणी करुन आपली किमया दाखविणार आहेत. एवढेच नव्हे, तर ते शहर उत्तर मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढविण्याची दाट शक्यता आहे.

Back to top button