सोलापूरच्या पर्यटन विकासासाठी केंद्राला प्रस्ताव : पर्यटनमंत्री लोढा | पुढारी

सोलापूरच्या पर्यटन विकासासाठी केंद्राला प्रस्ताव : पर्यटनमंत्री लोढा

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : सोलापूर जिल्ह्यात अनेक धार्मिक स्थळे आहेत. शहर-जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी जिल्हा हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करावा, अशी मागणी जिल्ह्यातील अनेक आमदार आणि खासदारांनी केली होती. त्याचा सहानुभूतीपूर्वक विचार करून सोलापूर जिल्हा हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करावा, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने केंद्र शासनाला प्रस्ताव पाठवू, अशी ग्वाही राज्याचे पर्यटन, कौशल्य विकास आणि महिला व बाल विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली आहे.

सोमवारी सकाळी लोढा यांच्या हस्ते सोलापुरातील केटरिंग महाविद्यालयाचा शुभारंभ करण्यात आला, यावेळी ते बोलत होते. यावेळी खा. जयसिध्देश्वर महास्वामी, आ. सर्वश्री सुभाष देशमुख, विजयकुमार देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, रणजितसिंह मोहिते-पाटील, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव राधिका रस्तोगी, पर्यटन संचालक भगवंत पाटील, निशीथ श्रीवास्तव, चंद्रशेखर जयस्वाल उपस्थित होते.

जिल्ह्यातील अक्कलकोटी स्वामी महाराज, पंढरपूर येथील पांडुरंग, जवळच असलेले गगणापूर येथील श्री दत्त, तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदीर आणि बार्शी येथील भगवंत मंदीर अशी अनेक नावाजलेली तीर्थ स्थळे आहेत. हा जिल्हा पर्यटन आणि तीर्थ क्षेत्राचा जिल्हा म्हणून घोषित करावा अशी मागणी सुरवातीला आ. सुभाष देशमुख यांनी केली. नंतर या मागणीला खा. महास्वामी, विजयमुमार देशमुख, आ. मोहिते पाटील यांनी ही दुजोरा दिला. सोलापूर येथील केटरिंग महाविद्यालयाला श्री स्वामी समर्थांचे नाव द्यावे, अशी मागणी यावेळी अनेकांनी केली होती. त्या मागणीचा ही सकारात्मक विचार करित लोढा यांनी केटरिंग महाविद्यालयाला श्री स्वामी समर्थ केटरिंग महाविद्यालय असे नाव देण्यात येत असल्याची घोषणा केली. यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, सीईओ दिलीप स्वामी, माजी सभापती विजयराज डोंगरे, संजय कोळी, राजकुमार पाटील, दिपक गवळी उपस्थित होते.

Back to top button