पंढरपूर; पुढारी वृत्तसेवा : आषाढी यात्रेकरिता येणार्या भाविकांना चंद्रभागेच्या पाण्यात पवित्र स्नान करता यावे, यासाठी उजनी धरणातून सोडलेले पाणी शनिवारी चंद्रभागेत दाखल झाले. पुंडलिक मंदिर परिसराच्या पायरीला पाणी लागले आहे. त्यामुळे मुबलक पाण्यात स्नानाचा आनंद घेताना भाविक दिसत आहेत. दरम्यान, भाविकांना स्नान करताना कोणताही दगाफटका होऊ नये म्हणून जीवरक्षक दलाच्या बोटी तैनात करण्यात आल्या आहेत. सध्या पंढरपूरमध्ये वारकर्यांचा सोहळा पाहायला मिळत आहे. आषाढी वारीसाठी लाखो भाविक पंढरपूरध्ये दाखल झाले आहेत. दर्शन रांगेत गर्दी वाढत आहे.
दर्शन रांग गोपाळपूर रोडवरील दर्शन शेडमध्ये दाखल झाली आहे. पंढरीत येणारा भाविक हा प्रथम चंद्रभागा स्नान करण्यास प्राधान्य देत असतो. भाविकांना चंद्रभागेच्या मुबलक पाण्यात आपले पवित्र स्नान करता यावे, याचा विचार करून प्रशासनाने उजनी धरणातून नदीत पाणी सोडले आहे. हे पाणी शनिवारी चंद्रभागेत पोहोचले आहे. त्यामुळे रविवारपासून मोठ्या प्रमाणात भाविक स्नान करण्याचा आनंद घेत आहेत.
पंढरपूर येथील चंद्रभागेत झालेल्या घाणीमुळे पाण्याला अतिशय दुर्गंधी येत होती. अशा पाण्यात स्नान करताना भाविकांच्या आरोग्याचा प्रश्न उभा राहिला होता. या पाण्यातून सुमारे 80 टन कचरा उचलण्यात आला आहे. त्यामुळे नदीपात्रात नवे स्वच्छ पाणी आल्याने भाविकांना स्वच्छ आणि मुबलक पाण्यात पवित्र स्नान करता येणार आहे. आता उजनी धरणातून हे पाणी आषाढी यात्रा संपेपर्यंत सोडले जाणार असल्याने भाविकांची आषाढी यात्रा आनंदी होण्यास मदत होणार आहे.
29 जून रोजी आषाढी यात्रा एकादशीचा मुख्य सोहळा साजरा होत आहे. या आषाढी वारीला राज्यासह परराज्यांतून मोठ्या संख्येने भाविक पंढरपुरात दाखल होत आहेत. यामध्ये विशेषतः तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक तसेच विदर्भ, कोकण, मराठवाड्यातील भाविकांची संख्या लक्षणीय असल्याचे दिसून येत आहे. यावर्षी श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी राज्यभरातून भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. बाजारपेठेमध्ये प्रासादिक वस्तूंची कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाल्यामुळे व्यापारी वर्गामध्ये उत्साहाचे वातावरण आहे. आषाढीचा सोहळा तीन दिवसांवर येऊन ठेपला आहे. या पार्श्वभूमीवर पेढे, चुरमुरे, बत्तासे, सुगंधित अगरबत्ती, अष्टगंध यासह फोटो फ्रेम, श्री विठ्ठल- रुक्मिणीच्या मूर्ती आदी प्रासादिक साहित्याची दुकाने सज्ज झाली आहेत.
चंद्रभागा नदीपात्रात स्नान करताना भाविक बुडण्याची घटना घडू नये म्हणून प्रशासनाच्या वतीने दोन फायबर स्पीड बोट, एनडीआरएफची तुकडी तैनात करण्यात आली आहे. वारकर्यांच्या बाबतीत सर्व ती दक्षता घेतली जात आहे.