

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : डेंटल कॉलेजच्या विद्यार्थिनीला लग्नाचे आमिष दाखवून महाबळेश्वरला फिरायला नेऊन तिथे तिच्यावर अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. अत्याचाराचे फोटो व्हॉटस्अॅपवर टाकण्याची धमकी संशयिताने दिली. याप्रकरणी नितीन राजप्पा कटके (वय 24, रा. बसवेश्वर गल्ली, औसा, जि. लातूर) याच्यासह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
याप्रकरणी सोलापूरच्या केगाव येथील एका डेंटल कॉलेजमध्ये बीडीएसच्या शेवटच्या वर्षात शिकणार्या 23 वर्षीय विद्यार्थिनीने फौजदार चावडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तिच्या ओळखीचा नितीन कटके हा तिला नेहमी फोन करत होता. त्यानंतर दोघांत मैत्री झाली. मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यानंतर 23 डिसेंबर 2022 रोजी सकाळी सहाच्या सुमारास कटके तिच्या कॉलेजसमोर कार घेऊन आला. तिला फोन करून कॉलेजच्या बाहेर बोलाविले. ती बाहेर आल्यावर चल आपण महाबळेश्वरला फिरून येऊ, असे सांगितले. ती नको म्हणत असताना तिला आपण लग्न करणार आहोत. तुझ्या घरी समजणार नाही, असे म्हटल्यावर ती कारमध्ये बसली. कटके याने तिला पुणे येथे त्याच्या चुलत भावाच्या घरी नेले. तेथून ती, कटके व त्याचा भाऊ व वहिणी असे महाबळेश्वर येथे आले. या वेळी नितीन याने भावाला व वहिणीला एक रूम व स्वतःला आणि त्या विद्यार्थिनीला एक रूम घेतली. लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केला. शरीरसंबंध करतानाचे फोटो काढले. ते फोटो व्हॉट्स अॅप व फेसबूकवर टाकण्याची धमकी दिली. नंतर आळंदी येथे जाऊन जबरदस्तीने लग्न केले.
या फिर्यादीवरून नितीन कटके, (वय 23 रा. बसवेश्वर गल्ली, औसा जि. लातूर), काशीनाथ कटके, निकेतन कटके, रेश्मा कटके सर्व (रा. पुणे), किसन व ज्योती अशा सहा जणांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. तपास सहायक पोलिस निरीक्षक दांडगे करत आहेत.