जागतिक योग दिन : माणसाला आयुष्यात तणावमुक्त राहण्यासाठी योगा हाच उत्तम उपाय | पुढारी

जागतिक योग दिन : माणसाला आयुष्यात तणावमुक्त राहण्यासाठी योगा हाच उत्तम उपाय

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा :  तणाव हा शरीरासाठी हानिकारक असतो. मग वाढत्या वजनाचा ताण असो की अभ्यासाचा ताण, नोकरीचा ताण किंवा इतर कोणताही ताण. मानसिक ताण-तणावापासून मुक्त राहण्यासाठी रोज किमान 30 मिनिटे योगा करणे गरजेचे आहे.

अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशनने 2017 मध्ये केलेल्या सर्व्हेक्षणात चारपैकी तीन लोकांमध्ये तणावाची लक्षणे आढळून आली. तणावामुळे शरीरातील कोर्टिसोल हार्मोन असंतुलित होतात. त्याचा आरोग्यावर अनेक प्रकारे नकारात्मक परिणाम होतो. तणावामुळे कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाणे कठीण होते. याचे कारण म्हणजे एड्रेनल ग्रंथीमध्ये असलेले कॉर्टिसॉल हार्मोन मेंदूमध्ये तणाव निर्माण करतो. त्यामुळे तणाव, नैराश्य, चिंता, स्किझोफ्रेनिया, वजन वाढणे, थकवा आणि रक्तातील साखरेसारखे अनेक आजार होऊ शकतात. दैनंदिन जीवनातील अडचणींमुळे लोक अनेक समस्यांशी झुंज देत आहेत. याकाळात तणावमुक्त राहण्यासाठी योगा हा उत्तम उपाय आहे. प्रत्येक नागरिकांनी योगा करण्याला प्राधान्य देण्याची गरज निर्माण झाली आहे. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात शांतीसाठी योगा हा चांगला मार्ग आहे.

श्वसनाच्या व्यायामानेे तणाव कमी

श्वसनाचा व्यायाम केल्याने मनाला शांती मिळते. हे अनेक संशोधनातून सिद्ध झाले आहे म्हणून औपचारिक ध्यान आणि नियंत्रित ब्रिदिंग व्यतिरिक्त आपण श्वसनाच्या व्यायामानेेदेखील तणाव कमी करू शकतो. श्वसनाच्या व्यायामानेे फुफ्फुसे मजबूत होतात. तणावाची पातळीदेखील कमी होते.

योगासनाने माणसाचे शरीर लवचिक बनते. योगा केल्याने शारीरिक ताण आणि तणावातूनही आराम मिळतो. दीर्घ श्वास घेऊन योगासने केल्याने मानसिक आराम मिळतो. योगामुळे रक्तदाबही कमी होत होतो. प्रत्येकाने रोज किमान 30 मिनिटे योगा करावा.
– ॠतिका श्रीराम, योगा प्रशिक्षक

Back to top button