पंढरपूर : काळेंनी टिकवले अस्तित्व; पाटलांची रोखली प्रतिष्ठा

पंढरपूर : काळेंनी टिकवले अस्तित्व; पाटलांची रोखली प्रतिष्ठा

पंढरपूर; सुरेश गायकवाड :  पंढरपूर तालुक्यातील राजकारण ज्याच्या भोवती फिरते, त्या विठ्ठल कारखान्याची निवडणूक सहा महिन्यांपूर्वी जिंकत अभिजित पाटील यांनी कारखाना ताब्यात घेतला आहे. तर विठ्ठल परिवारातीलच सहकार शिरोमणी (चंद्रभागा) कारखाना ताब्यात घेऊन पंढरपूर तालुक्याचे राजकारण आपल्या हाती घेण्याची व्यूहरचना अभिजित पाटील यांनी आखली होती. त्यादृष्टीने तयारी देखील करण्यात आली. मात्र, सहकार शिरोमणी कारखाना निवडणुकीत सत्ताधार्‍यांसह विरोधकांनी प्रचाराची खालच्या स्तराची पातळी गाठत प्रचार केला. त्यामुळे सभासदांनी या निवडणुकीत शेतकर्‍यांच्या पाठीशी ठामपणे उभारणार्‍या पॅनेलच्या हातात सत्ता दिली आहे. त्यामुळे कल्याणराव काळे यांचे अस्तित्व टिकले आहे, तर अभिजित पाटील यांची प्रतिष्ठाही रोखण्यात काळे यशस्वी झाले आहेत.

पंढरपूर तालुक्यासह सोलापूर जिल्ह्याच्या राजकीय व सहकार क्षेत्राचे लक्ष लागून राहिलेल्या सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या (चंद्रभागा) निवडणुकीत विठ्ठल परिवारप्रणीत कल्याणराव काळे यांचे पॅनल विजयी झाले. या अत्यंत चुरसीच्या निवडणुकीत विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष व राष्ट्रवादीचे नेते अभिजित पाटील यांना पंढरपूर बाजार समिती निवडणुकीनंतर सहकार शिरोमणीचा हा आणखी धक्का मानला जात आहे. या निवडणुकीमुळे विठ्ठल परिवारातील मतभेद संपून एकोपा दिसून आला आहे. याचाच हा विजय मानला जात आहे.

'श्री विठ्ठल'च्या निवडणुकीनंतर अभिजित पाटील यांनी डॉ. वी. पी. रोंगे व अ‍ॅड. दीपक पवार यांना या निवडणुकीमध्ये उतरवले. यामुळे पहिल्यांदाच एवढी चुरस निर्माण झाली होती. केवळ 10 हजार 890 सभासद असलेल्या सहकार शिरोमणी संस्थेची निवडणूक लावली. स्वत: सभासद व मतदार नसताही अभिजित पाटील यांनी वेरजेचे राजकारण करत पॅनेल लावण्याचे धाडस केले. 4 हजार च्या जवळपास उमेदवारांनी मते घेतली. त्यामुळे पॅनेल पडले असले तरी अभिजीत पाटील यांना जनाधार वाढत असल्याचे चित्र दिसून येते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा.शरद पवार यांनी सहकार शिरोमणीच्या निवडणुकीपूर्वी विठ्ठल कारखान्याला भेट दिली. अभिजित पाटील यांना पक्षात प्रवेश दिला.पंढरपूर -मंगळवेढ्याचे 2024 चे विधानसभेचे उमेदवार असतील, असे जाहीर केले. यामुळे भगीरथ भालके-कल्याणराव काळे गटात नाराजीचा सूर होता. अभिजित पाटील यांनी कारखान्याचे चेअरमनपद स्वीकारल्यापासून भगीरथ भालके, कल्याण काळे व युवराज पाटील, गणेश पाटील यांना डावलले आहे. कारखाना कार्यस्थळावर झालेल्या पवारांच्या सभेसही विठ्ठल परिवारातील या नेत्यांना निमंत्रण दिले नव्हते. याचाही राग म्हणून विठ्ठल परिवारातील सर्वजण एक झाले. विठ्ठलचा राग सहकार शिरोमणीच्या निवडणुकीत काढला.

दरम्यान, विठ्ठल कारखान्याच्या निवडणुकीनंतर पंढरपूर भागातील राजकारण बदलले गेले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेतृत्व अभिजित पाटील यांच्याकडे गेले. त्यांनी साहजिकच येथील विरोधक असणारे प्रशांत परिचारक यांना आव्हान देण्यास सुरुवात केली आहे. यामुळे अगोदर येथील नेते दुखावले आहेत. अभिजित पाटील यांनी विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी पक्षात जाण्याचा निश्चय केला आहे. त्यामुळे अभिजित पाटील यांची राजकीय घोडदौड रोखण्यासाठी काळे – भालके गटाला माजी आ. प्रशांत परिचारक, आ. बबनदादा शिंदे यांनी पाठबळ दिले आहे. त्यामुळे सहकार शिरोमणी कारखान्याच्या निवडणुकीत काळे यांना यश आले आहे.

या निवडणुकीत भालके व अभिजित पाटील यांच्याकडून विधानसभेचा मुद्दा सतत उचलला गेला. या निवडणुकीच्या निमित्ताने भालके यांनी आपली भाषणाची आक्रमक शैली पुन्हा पंढरपूरच्या जनतेला दाखवून दिली. भगीरथ भालके यांनी सभा गाजवल्या. काळेंच्या मदतीला भालके आल्याने सभासदांनी कल्याणराव काळे यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवला. सुमारे 1818 मतांच्या फरकाने त्यांचे पॅनल विजयी केले. या निवडणुकीमुळे पंढरपूरच्या राजकारणात विठ्ठल परिवार व त्यांची एकसंघता किती महत्त्वाची आहे हे पुन्हा दिसून आले आहे. तर दुसरीकडे काळे गट या कारखाना निवडणुकीमुळे पुन्हा मजबूत होण्यास मदत झाली आहे.

काळे यांना परिचारकांचे सहकार्य

विठ्ठल कारखाना निवडणूक जिंकून अभिजित पाटील यांनी विठ्ठल परिवाराची सूत्रे हाती घेतली होती. त्यामुळेच तालुक्यावर आणखी पकड मजबूत करण्यासाठी त्यांनी पंढरपूर बाजार समितीची निवडणूक लावली. मात्र या निवडणुकीत काळे -भालके यांनी तटस्थ राहून एक प्रकारे परिचारकांना मदत केली. या निवडणुकीत अभिजित पाटील गटाचा पराभव झाला, तर सहकार शिरोमणी कारखान्याच्या निवडणुकीत काळे यांना परिचारकांनी सहकार्य केल्याने अभिजित पाटील गटाचा पराभव झाला असल्याचे चित्र दिसून येते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news