सोलापूर : राजकीय गटांच्या सहकार्याने विजयाचा मार्ग सुकर

सोलापूर : राजकीय गटांच्या सहकार्याने विजयाचा मार्ग सुकर
Published on
Updated on

करमाळा; अशपाक सय्यद :  करमाळा तालुक्यातील प्रतिष्ठित मकाई कारखान्याच्या या पंचवार्षिक निवडणुकीत मतदान चुरशीचे
होण्याऐवजी न्यायालयातील चुरस तालुक्याने पाहिली. कारखान्याची देणी असूनही तसेच बागलांच्या इतर सर्व राजकीय विरोधकांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहकार्य केल्याने बागल गटाने आपली सत्ता एकहाती मिळविली. विरोधकांचे मकाई परिवर्तन पॅनेलचे सर्व डावपेच फेल गेले.

बागल गटाच्या अचूक व योग्य नियोजनामुळे बागल गट मकाई कारखान्यामध्ये यशस्वी होताना दिसत आहे. या निवडणुकीमध्ये बागल गटाच्या स्व. दिगंबररावजी बागल मकाई पॅनेलच्या विरोधात दत्तकला शिक्षण संस्थेचे चेअरमन प्रा.रामदास झोळ यांच्या नेतृत्वाखालील मकाई परिवर्तन पॅनेलने सुरुवातीपासून लढा उभारला होता. माध्यमातून बागल गटावर सातत्याने कारभाराविषयी निशाणा साधला होता. याउलट बागल गटाने या निवडणुकीत पत्रकारांपासून दूर राहत माध्यमांचा अजिबात वापर न करता मुळापासून व नेमके मतदारांचे मतदान हेरले असल्याने योग्य पद्धतीने प्रचाराची धुरा सांभाळली.

एवढेच नव्हे, तर विरोधकांची सर्वच बाजूंनी कोंडी करत विरोधकांना उमेदवार मिळू न देण्यापासून अखेरपर्यंत मतदाराचा निकाल येईपर्यंत बागल गट हा सातत्याने आघाडीवर राहिला. प्रा. झोळ यांच्या परिवर्तन पॅनेलला अवघे चारच उमेदवार हाती लागले. हे चार उमेदवार पाच जागी लढा देत होते, तर इतर 14 उमेदवारांच्या न्यायालयीन लढ्यामध्ये प्रा.झोळ यांना गुंतून राहावे लागले. त्यामुळे प्रा. झोळ यांच्या परिवर्तन पॅनेलला फारशी प्रचाराची संधीही मिळाली नाही. या निवडणुकीत छाननीदिवशीच मकाई कारखाना बिनविरोध होईल की काय, असे चिन्ह असताना आठ उमेदवार हे बागल गटाचे बिनविरोध झाले होते, तर नऊ उमेदवार रिंगणात राहिले होते. बागल समर्थकच सभासद मतदार असल्याने बागल गटाचा विजय हा अपेक्षितच होता, याबाबत या निवडणुकीत पुन्हा शिक्कामोर्तब झाले आहे. मकाई कारखान्याच्या निवडणुकीत प्रा. रामदास झोळ हे मकाई परिवर्तन पॅनेलच्या माध्यमातून बागल विरोधात उभे झाले होते.

आमदार संजयमामा शिंदे यांनी बागल गटाला उघड मदत केल्याचे दिसून येते. आमदार शिंदे यांचा अपवाद वगळता सर्वच समर्थकांनी बागलांना मदत केल्याचे दिसून आले. यामध्ये आदिनाथ कारखान्याचे माजी चेअरमन वामन बदे अपवाद ठरले. माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी बागल गटाला विरोध केला नाही. शिवसेनेत गेलेले नगराध्यक्ष वैभवराजे जगताप यांनी फक्त प्रा.झोळ यांची भेट घेऊन मतदानाविषयी चर्चा केली. माजी आमदार नारायण पाटील यांनी कोठेही हस्तक्षेप केला नाही. अनेकांची प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहकार्य मिळाले.

आम्ही या कारखान्यासाठी आमची संपूर्ण प्रॉपर्टी पणाला लावली. आम्ही कधीच शेतकर्‍यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. घरची मालमत्ता गहाण ठेवायलाही कमी करत नाही. शासनाच्या धोरणाने काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. तरीही आम्ही यावर मात करून कारखान्याची वाढ करण्याबरोबर शेतकर्‍यांचे पेमेंट देण्यास बांधिल आहोत.
– दिग्विजय बागल, माजी चेअरमन, मकाई कारखाना

निवडणुकीत उमेदवारांना अपात्र करण्याचा प्रयत्न चुकीचा आहे. 'मकाई'तील गैरकारभार उघड करण्याचा आमचा प्रयत्न आहे. न्यायालयीन लढा आम्ही सुरू ठेवणार आहे. कसल्याही परिस्थितीत आम्ही लढा जिंकणारच व काही संचालकांचे पद रद्द करू किंवा संचालक मंडळच बरखास्त करू.
– प्रा. रामदास झोळ, विरोधी गट, मकाई कारखाना

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news