वडवळ : ग्रामदेवतेच्या श्रद्धेपोटी 'या' गावात बांधली नाहीत दुमजली घरे | पुढारी

वडवळ : ग्रामदेवतेच्या श्रद्धेपोटी 'या' गावात बांधली नाहीत दुमजली घरे

जगन्नाथ हुक्केरी, पुढारी वृत्तसेवा : म्हणतात ना, देव हा भक्‍तीचा भुकेला आहे तसाच भक्‍त हाही श्रद्धा आणि भक्‍तीचा उपासक असतो. अशाच श्रद्धेपोटी अनेक परंपरा आणि प्रथांचा जन्म झाला आहे. काही प्रथा चांगल्या आहेत, तर काही प्रथा वाईट आहेत. मोहोळ तालुक्यातील वडवळ येथील ग्रामदैवत नागनाथ आणि कारंबा (ता. उत्तर सोलापूर) येथील ग्रामदैवत बडीबी माँ यांच्यावरील श्रद्धेपोटी या दोन्ही गावांतील नागरिक दुमजली घरे, दुकाने किंवा इतर बांधकाम करत नाहीत. विशेष म्हणजे मंदिराच्या उंचीपेक्षा तेथील घरांची उंची फारच कमी आहे.

वडवळमध्ये बाराव्या शतकापासून म्हणजे जगद‍्गुरु महात्मा बसवेश्‍वरांच्या काळापासून ही प्रथा पाळली जात आहे. नागनाथांच्या श्रद्धेपोटी वडवळमध्ये एकमजली घरे बांधली जातात. ग्रामदैवत श्री नागनाथ महाराज हे नागराज संप्रदायातील भक्तीस्थान आहे. विविध आख्यायिकांमुळे नागनाथाची महिमा सर्वदूर आहे.

नागनाथ मंदिरातील चौघडा दुसर्‍या मजल्यावर असल्याने त्यापेक्षा उंचीचे गावात बांधकाम करायचे नाही, अशी गावकर्‍यांची भावना आहे. यामुळे गावात कोणतेही बांधकाम करताना दुसरा मजला बांधला जात नाही. वडवळ हे सधन बागायतदार,  नोकरदारांचे गाव आहे.

गाव उजनी धरणाच्या लाभ क्षेत्रात असल्याने गाव शिवारातील  शेतीही उत्तम आहे. बागायतीचे क्षेत्र अधिक आहे. गावात राहणार्‍या श्रीमंत ग्रामस्थांप्रमाणे गरिबांचीही मोठ्या प्रमाणात घरे आहेत. गरीब असो वा श्रीमंत कोणीही गावातच नव्हे, तर गाव परिसरात आपले घर, दुकान व अन्य कोणतेही बांधकाम दुमजली  बांधत नाहीत. नागनाथांच्या चौघड्याच्या उंचीपेक्षा अधिक उंचीचे बांधकाम करत नाहीत.

सोलापूर

लग्‍नात गादी देण्याची प्रथाही नाही

वडवळ परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात खर्च करून धुमधडाक्यात लग्न सोहळे पार पाडतात;  पण वर किंवा वधू पक्षाकडून पलंगावरील गादी दिली अथवा घेतली जात नाही. नागनाथाची मूर्ती पालखीमध्ये गादीवर प्रतिष्ठापित असल्यामुळे गावात गादी न वापरण्याची प्रथा आहे.

अगदी लहान मुलांच्या पाळण्यातही गादी वापरली जात नाही. नागनाथाची मूर्ती पालखीमध्ये ज्या गादीवर विराजमान केली जाते त्या गादीवर मखमल अंथरली जाते. त्यामुळे मखमलीचे कपडेही गावात वापरत नाहीत. गावामध्ये मखमलीच्या कपड्यांची विक्रीही केली जात नाही.

कारंब्यात बडीबी माँचा दर्गा

कारंबा (ता. उत्तर सोलापूर) येथे बडीबी माँचा दर्गा आहे. हा दर्गा कबरीसारख्या जागेवर वसवलेला आहे. त्याची उंची फारच कमी आहे. त्यापेक्षा अधिक उंचीची घरे, इमारती किंवा अन्य बांधकाम असू नये, अशी येथील नागरिकांची धारणा आहे. यामुळे कारंब्यासह परिसरात फार उंच, दुमजली घरे बांधली जात नाहीत.

काहीजणांनी दुमजली घरे बांधली, पण त्यांचे नुकसान झाल्याचे आणि त्यांना त्रास झाल्याचेही नागरिक सांगतात. हा श्रद्धेचा विषय आहे, अंधश्रद्धेचा नाही, अशीही भावना कारंब्याच्या नागरिकांची आहे. गावाची परंपरा कायम टिकून ठेवण्यासाठी भविष्यातही ही प्रथा कायम ठेवण्याचा ग्रामस्थांचा निर्धार आहे.

वडवळ (ता. मोहोळ) येथील पोपटबुवा शिवपुजे, खर्गे महाराज सांगतात की, “वडवळ परिसरात सोमवारच्या दिवशी शेतकरी बैलासह ट्रॅक्टरच्या सहाय्याने नांगरणी, कुळवणीसह इतर शेतीची कामे  करत नाहीत. यामागे श्री नागनाथाबद्दलची श्रद्धा आहे.”

वडवळ (ता. मोहोळ) येथील आकाशबपवा शिवपुजे, खर्गे महाराज सांगतात की, “श्री नागनाथ हे आम्हा वडवळकरांचे परमदैवत आहे. त्यांच्यावरील श्रद्धेपोटी आम्ही या प्रथा पाळतो. या प्रथा पाळण्यात आम्हाला आत्मिक आनंद मिळतो. येणार्‍या काळात या प्रथा सुरूच राहणार आहेत, यात शंका नाही.”

पहा व्हिडीओ : कोल्हापुरातील हिंदू -मुस्लिम ऐक्याचा संदेश देणारा दर्गा

Back to top button