पंढरपूर अर्बन बँकेच्या 22 एटीएममधून 3 कोटींचा गंडा | पुढारी

पंढरपूर अर्बन बँकेच्या 22 एटीएममधून 3 कोटींचा गंडा

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा :  पंढरपूर अर्बन बँकेच्या एकूण 22 एटीएममधून मशीनशी छेडछाड करून सरकारी व खासगी बँकेचे 668 एटीएम कार्ड वापरत तीन कोटी रुपये इतकी रक्कम काढण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

बँकेकडून याबाबत सांगण्यात आले, की या प्रकारात बँकेच्या कोणत्याही ठेवीदार, सभासद, ग्राहक खातेदाराच्या खात्यातील रक्कम गेलेली नाही. खातेदाराचे नुकसान झालेले नाही. या प्रकरणाची माहिती एनपीसीआय, रिझर्व्ह बँक इंडिया यांना कळविली आहे. हा एक तांत्रिक चोरीचा प्रकार आहे आणि याबाबत बँकेची इन्शुरन्स पॉलिसी उपलब्ध आहे. या प्रकारातून बँकेला कोणताही तोटा नाही. या व्यवहारात बँकेचा पैसा हा तांत्रिक कारणाने अडकलेला आहे. सरकारी व खासगी बँकांचे कार्ड वापरून ही घटना घडली आहे. त्या सर्व बँकांकडे बँक क्लेम केले आहेत. आपल्याबरोबरच इतरही काही बँकांच्या एटीएममधून हा प्रकार घडला आहे. काही बँकांचे आरोपी पकडलेही गेले आहेत. त्यांचा तपास चालू आहे. या तपासामध्ये पकडले गेलेल्या संशयितांचे आपल्या व्यवहारात धागेदोरे असल्याचा प्राथमिक संशय असल्याचे बँकेने व्यक्त केला आहे. या प्रकरणात पंढरपूर अर्बन बँकेचे एकही एटीएम कार्ड वापरण्यात आलेले नाही. सर्व 668 एटीएम इतर बँकांचे आहेत, असेही बँकेने स्पष्ट केले आहे.

एटीएममध्ये झालेला प्रकार लक्षात येताच बँकेने या संदर्भात पोलीस खात्यात रीतसर तक्रार नोंदवली आहे. प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी यासाठी बँक व्यवस्थापन व संचालक प्रयत्नशील आहेत.
– सतीश मुळे चेअरमन, पंढरपूर अर्बन को-ऑप. बँक

Back to top button