सोलापूर : साखरपुडा कार्यक्रमाला न बोलावण्याच्या कारणावरून महिलेस दगडाने मारहाण

मंगळवेढा, पुढारी वृत्तसेवा : तू आम्हाला साखरपुडयाला का बोलावले नाही? असे म्हणून गैरकायदयाची मंडळी जमवून एका ३२ वर्षीय महिलेस दगडाने मारून गंभीर जखमी केल्याप्रकरणी मनोज गडहिरे,रमेश जगधाने,बिरू गडहिरे,संजय कांबळे,बाबू गडहिरे या पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, यातील फिर्यादी सुनिता आनंद माने (रा.सिध्दनकेरी) यांची मुलगी प्रगती हिचा १६ मे रोजी साखरपुडा झाला होता. याकरीता फिर्यादीने गावातील काही प्रतिष्ठित लोक व पै पाहुण्यांना बोलावले होते. दि.5 जून रोजी सायंकाळी ७ वा. फिर्यादी ही घरासमोर भांडी घासत बसली असता वरील आरोपीने येवून तुला लय मस्ती आली आहे. तू आम्हाला साखरपुड्याला का बोलावले नाही? असे म्हणाले. त्यावेळी फिर्यादीने माझे पती कामास बाहेरगावी गेले आहेत, ते आल्यानंतर त्यांना विचारा असे म्हणताच आरोपींनी सदर फिर्यादीस लाथाबुक्क्यांनी मारहाण करत तेथे पडलेला दगड घेवून फिर्यादीच्या पाठीत मारून गंभीर जखमी केले.
फिर्यादीचे केस धरून खाली पाडले. व शिवीगाळ केली.त्यावेळी फिर्यादीचा मुलगा याने आरडाओरडा करण्यास सुरुवात केल्यानंतर आरोपी निघून गेले. या मारहाणीच्या प्रसंगी फिर्यादीच्या गळयातील अर्धा तोळयाचे मंगळसुत्र गहाळ झाले असल्याचे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. याचा अधिक तपास पोलिस करीत आहेत.