पंढरपूर : श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात सेवा करण्याची भाविकांना संधी | पुढारी

पंढरपूर : श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात सेवा करण्याची भाविकांना संधी

पंढरपूर; पुढारी वृत्तसेवा :  श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात भाविकांना सेवा करण्याची संधी द्यावी, अशी मागणी भाविकांमधून केली जात होती. त्यानुसार मंदिर समितीने विनामूल्य सेवा देण्यासाठी विठ्ठल सेवक योजना राबविण्यात येणार आहे. यासाठी इच्छुक भाविकांनी अर्ज करण्यास 4 जूनपासून सुरुवात केल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी तुषार ठोंबरे यांनी दिली.

शेगावच्या श्री संत गजानन महाराज देवस्थानच्या धर्तीवर भाविकांना श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीकडेे विनामूल्य सेवा करण्याबाबत भाविकांकडून विचारणा झाली होती. याची दखल घेऊन मंदिर समितीने विठ्ठल सेवक योजना राबविण्याचा ठराव दि. 20 एप्रिल रोजीच्या सभेत पारित केला होता. या योजनेमध्ये 7 व्यक्तींचा 1 गट तयार केला आहे. रविवार ते शनिवार 1 गट काम करेल, असे एका आठवड्यात सकाळी 6 ते दुपारी 2 व दुपारी 2 ते रात्री 10 व रात्री 10 ते सकाळी 6 या वेळेत आठवडाभर सेवा देतील. एका सेवकाला एकापेक्षा अधिक गटांमध्ये नोंदणी करता येणार आहे. अशा गटांना मंदिर समितीच्या विविध ठिकाणी सेवेची संधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

काही गटांना वर्षातून एका पेक्षा जास्त वेळा सेवेची इच्छा असेल तर त्यांना वर्षातून एका पेक्षा जास्त वेळेस सलग 7 दिवस सेवेची संधी देण्यात येणार आहे. या गटांना प्रथम गोशाळा, भक्तनिवास, अन्नछत्र, दर्शन रांगेतील स्वच्छता, दर्शन रांग द्रुतगतीने चालविणे, परिवार देवता मंदिरे व इतर ठिकाणी वर्षातून सलग 7 दिवस सेवेची संधी दिली जाईल. तसेच या सेवकांची भोजन व निवास व्यवस्था मंदिर समिती मार्फत मोफत करण्यात येणार आहे. इच्छुक भाविकांनी या योजनेमध्ये सहभाग नोंदविण्यासाठी मंदिर समिती कार्यालयात विहित नमुन्यात अर्ज सादर करावेत, असे आवाहन श्री विठ्ठल-रूक्मिणी मंदिर समितीने केले आहे. सदर योजनेच्या अटी, शर्ती, माहिती व अर्जाचा नमुना मंदिर समितीच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसेच श्री संत तुकाराम भवन पंढरपूर येथील कार्यालयातही अर्ज उपलब्ध असल्याचे मंदिर समितीकडून सांगण्यात आले.

या ठिकाणी बजावता येईल सेवा

सेवाभावी भाविकांना मंदिरात व इतर इमारतींमध्ये स्वच्छता करणे, परिवार देवता, दर्शन रांग द्रुतगतीने चालविणे, भोजनप्रसाद वाटप करणे, गोशाळेत स्वच्छता करणे, महावस्त्रांची विगतवारी करणे, दान-देणगीची विगतवारी करणे आदी प्रकारच्या सेवा करण्याची संधी देण्यात येणार आहे.

 

Back to top button