राष्ट्रवादीचे भगीरथ भालके ‘केसीआर’च्या भेटीला | पुढारी

राष्ट्रवादीचे भगीरथ भालके ‘केसीआर’च्या भेटीला

सोलापूर, पुढारी वृत्तसेवा : पंढरपुर येथे राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भगीरथ भालके हे तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या भेटीसाठी हैद्राबादला रवाना झाले आहेत. बुधवारी (दि. 7) ते केसीआर यांच्याशी राजकीय चर्चा करणार आहेत. दरम्यान, केसीआर यांनी भालके यांच्यासाठी सोलापूरमध्ये खास विमान पाठविले आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसला हा मोठा धक्का मानला जात आहे.

भगीरथ भालके हे 2024 मध्ये भारत राष्ट्र समितीकडून विधानसभेची निवडणूक लढविण्याची शक्यता आहे. राव यांच्यासोबतच्या या भेटीत काय काय ठरतं, यावर बरंच काही अवलंबून आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार हे नुकतेच श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर बायो-सिएनजी प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी आले होते. यावेळी विठ्ठल साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी 2024 ला पंढरपूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार अभिजित पाटील असतील, असे खा. पवार यांनी जाहीर केले होते. त्यातच या कार्यक्रमाला भगीरथ भालके यांना आमंत्रण दिले नव्हते.

अभिजित पाटील यांना राष्ट्रवादीची उमेदवारी मिळणार असल्याने भालके अस्वस्थ आहेत. मागील आठवड्यात त्यांनी पंढरपूर व सोमवारी मंगळवेढा येथे आंदोलन करुन राजकीय धुरीणांचे लक्ष वेधले आहे. पंढरपूर विधानसभा लढवणारच, असा ठाम निर्धारही त्यांनी केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे तिकीट मिळो अथवा ना मिळो, जनता हाच आपला पक्ष म्हणून निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. त्यातच भालके यांना भारत राष्ट्र समितीचे प्रमुख तथा तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या कार्यालयातून पक्षप्रवेशासाठी संपर्क साधण्यात आला होता. भालके यांनी आजपर्यंत ‘वेट अँड वॉच’ची भूमिका घेतली होती. मात्र, मंगळवारी ते चार्टर्ड विमानाने हैदराबादला रवाना झाले आहेत. अभिजित पाटील यांना विधानसभा उमेदवारी देण्याचे संकेत पक्षाने दिले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीतील भालके, कल्याणराव काळे आणि युवराज पाटील हे विठ्ठल परिवारातील नेतेमंडळी नाराज झाले होते.

सहकार शिरोमणी साखर कारखाना निवडणुकीचे निमित्त साधून भगीरथ भालके यांनी शक्तीप्रदर्शन करत आपली भूमिका जाहीर केली होती. त्यात त्यांनी विधानसभेची आगामी निवडणूक संपूर्ण ताकदीने लढणार असल्याचे जाहीर केले होते. पवारांच्या दौर्‍यानंतर अवघ्या चार दिवसांत तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांच्या कार्यालयातून भालके यांना फोन आला होता. भालके यांनी पक्षात प्रवेश करावा. विधानसभेच्या उमेदवारीसह पक्षाची आणखी काही जबाबदारी देण्याचा शब्दही राव यांच्याकडून दिल्याची चर्चा आहे. भालके यांना बी.आर.एस.मध्ये सामील करून घेण्याची जबाबदारी केसीआर यांची कन्या आणि निकटवर्तीय आमदारांवर सोपविली आहे. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसला हा मोठा हादरा मानला जात आहे. आगामी काळात भगीरथ भालके यांच्या निर्णयाने पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातील राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता आहे.

भालकेंच्या निर्णयाबाबत उत्सुकता

आ. भारत भालके यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र भगीरथ भालके यांनी पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक लढविली होती; मात्र यात त्यांचा निसटता पराभव झाला आहे. पंढरपूर-मंगळवेढा तालुक्यात भालके यांना मानणारा मोठा मतदार आहे. त्यामुळे भगीरथ भालके बीआरएसमध्ये सामील होतात की? राष्ट्रवादी पुन्हा त्यांना उमेदवारी देते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Back to top button