परिवहन विभागात येणार 187 इंटरसेप्टर वाहने; केंद्र सरकारकडून निधी | पुढारी

परिवहन विभागात येणार 187 इंटरसेप्टर वाहने; केंद्र सरकारकडून निधी

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा :  राज्यात महामार्गांवर नियमांचे उल्लंघन करून अपघातास कारणीभूत ठरणार्‍या वाहनचालकांवर अंकुश ठेवण्यासाठी परिवहन विभागात 187 इंटरसेप्टर वाहने दाखल होणार आहेत. केंद्र सरकारच्या रस्ते सुरक्षा सुधारणा आणि अंमलबजावणी विशेष निधीतून ही वाहने खरेदी होणार आहेत.

मद्याच्या नशेत वाहन चालवणे, महामार्गावर मार्गिका ओलांडणी, वेगमर्यादेचे उल्लंघन ही महामार्गांवरील अपघातांची प्रमुख कारणे आहेत. वेगमर्यादेचे उल्लंघन करणार्‍यांवर कारवाई करताना वाहनचालक आणि आरटीओ यांच्यात वाद निर्माण होतात. यामुळे जागेवर पुराव्यासह कारवाई करण्यासाठी परिवहन विभागातील वायुवेग पथकाकडून इंटरसेप्टर वाहनांची मागणी करण्यात आली होती.
वायुवेग पथकासाठी 283 इंटरसेप्टर वाहनांची मागणी सरकारकडे करण्यात आली आहे. यापैकी 183 वाहन खरेदीसाठी गृह (परिवहन) विभागाने मंजुरी दिली आहे. लवकरच वाहनांसाठी निविदा मागवून ही वाहने रस्ते सुरक्षासाठी वापरण्यात येणार आहेत. असे परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी सांगितले.

आधुनिक लेझर वेगमापक यंत्रामुळे (स्पीड गन) दीड ते दोन कि.मी.च्या पट्ट्यातील वाहनांचा वेग नोंदवता येणे शक्य आहे. या वेगमापक यंत्रासह अल्कोहोल ब्रीथ ऍनालायझर, टिन्ट मीटर अशा यंत्रणांची सोय इंटरसेप्टर वाहनांमध्ये आहे. एका इंटरसेप्टर वाहनाची किंमत साधारण 20.50 लाख रुपये इतकी असते.

केंद्राच्या 57 कोटींच्या निधीपैकी 38.33 कोटींचा निधी वापरण्यात येणार आहे. ऑगस्ट 2021 मध्ये परिवहन विभागाच्या ताफ्यात 76 इंटरसेप्टर वाहने दाखल झाली आहेत. परिवहन विभागास मिळणार्‍या 187 इंटरसेप्टर वाहनांपैकी कोणत्या शहराला किती वाहने मिळणार हे अद्याप निश्चित झाले नाही. यापैकी काही वाहने सोलापूरला मिळतील ही आशा शहरवासीयांनी करण्यास हरकत नाही.

अनेक सुविधांमुळे वाहन परिपूर्ण

स्वयंचलित वाहन क्रमांक नोंदवण्याची क्षमता असलेल्या उच्च दर्जाचे कॅमेरे आणि अन्य सुविधा या वाहनांमध्ये आहेत. राज्यातील प्रमुख मार्गांवर ही वाहने तैनात करण्यात आली आहेत, असे वायुवेग पथकातील अधिकार्‍यांनी स्पष्ट केले.

Back to top button