सोलापूर : ४४० शाळांत आज घंटा वाजणार | पुढारी

सोलापूर : ४४० शाळांत आज घंटा वाजणार

सोलापूर ; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील कोरेानामुक्त असलेल्या 440 गावांत सोमवारपासून (दि. 12) इयत्ता आठवी ते बारावीच्या शाळा सुरू होणार आहेत. त्यामध्ये प्राथमिकच्या 83 व माध्यमिक विभागाच्या 357 शाळांचा समावेश आहे.

गेल्या मार्च 2020 पासून या शाळा बंद होत्या. आता दीड वर्षांनी या शाळांमध्ये खुलेआम घंटा वाजणार असल्याने विद्यार्थी व पालकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. अर्थात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगसह सर्व उपाययोजनांची खबरदारी घेण्यात आली आहे.

गेल्या फेब्रुवारी-मार्च 2020 पासून देशात कोरोनाचा शिरकाव झाला. त्यामुळे खबरदारीच्या उपाययोजना म्हणून गेल्या दीड वर्षापासून सर्वच शाळा बंद होत्या. अर्थात शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ऑनलाईन शिक्षण सुरू करण्यात आले.

काही प्रमाणात हे सुरू असले तरी त्याचे आकलन विद्यार्थ्यांना जितके वर्गात होते तितके ऑनलाईन होत नसल्याच्या तक्रारी आहेत. यामुळे कोरोनामुक्त गावात शाळा सुरू कराव्यात यासाठी शिक्षण संस्थांनी जिल्हाधिकारी तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली होती.

त्यानुसार त्यांनी शासनाकडे शाळा सुरू करण्यासंदर्भात प्रस्ताव पाठविला होता. यासंदर्भात शासनानेही कोरोनामुक्त गावात आठवी ते बारावी शाळा सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

दरम्यान, शासन आदेशानुसार पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी कोरेानामुक्त गावात इयत्ता आठवी ते बारावीच्या शाळा सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यासाठी कोरोनामुक्त गावात मागील एक महिन्यापासून एकही कोरोना रूग्ण निघाला नाही अशा गावात शाळा सुरू होणार आहेत. ही अट घालण्यात आली आहे. अशी सोलापूर जिल्ह्यातील 1 हजार 87 गावापैकी 678 गावे कोरोनामुक्त आहेत. माध्यमिक विभागाच्या 350 ते 357 शाळा सुरू करता येऊ शकतात.

त्यासाठी प्रोजेक्ट शाळा म्हणून दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी गावातील शाळा सुरू केली जाणार आहे. याअंतर्गत बोरामणी येथे शाळा सुरू करण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी हे उपस्थित राहणार आहेत.याबरोबर इतरही शाळा सुरू केल्या जाणार आहेत. त्यासाठी शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, गावातील सरपंच ग्रामसेवक यांच्या उपस्थित अन्य शाळा सुरू होणार आहेत.

सोशल डिस्टन्स राखून भरणार शाळा

जिल्ह्यातील प्राथमिकच्या 83 कोरोनामुक्त शाळा आहेत. त्या ठिकाणी वर्ग खोल्यांचे सॅनिटायझिंग केले जाणार आहे. याबरोबर कोरोना विषाणू लक्षात घेता सोशल डिस्टन्स राखून या शाळा भरविल्या जाणार आहेत, जेणेकरून दोन विद्यार्थ्यांमध्ये अंतर असावे. शिक्षण विभागाकडून संपूर्णत: या शाळा सुरू करण्याबाबतचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी संजयकुमार राठोड यांनी दिली.

Back to top button