सोलापूर : नगरसेवक पुत्रास पुण्यातून अटक | पुढारी

सोलापूर : नगरसेवक पुत्रास पुण्यातून अटक

सोलापूर ; पुढारी वृत्तसेवा : शहरातून तडीपार असताना नगरसेवक पुत्र विकी लक्ष्मण जाधव आणि त्याचा साथीदार संदीप राम गायकवाड याने एका नागरिकाच्या दुचाकीस धडक देऊन मारहाण केली. त्यानंतर ते पुन्हा फरार झाले होते. या दोघांना विजापूर नाका पोलिसांनी पुणे येथे अटक केली आहे.

विकी जाधव (रा. सेेटलमेंट, सोलापूर) याला सोलापूर शहर पोलिसांनी आयुक्तालयाने शहरातून तडीपार केले होते. तडीपारचा आदेश असताना देखील त्याने 16 मार्च 2021 रोजी एका नागरिकाच्या दुचाकीस धडक दिली होती. धडक देऊन तू मला ओळखत नाही का, मी कोण आहे, असे म्हणत शिवीगाळ आणि दमदाटी करीत हातामध्ये दगड घेऊन माराहण केली होती.

मारहाणीमध्ये जखमी झाल्यानंतर त्याने याबाबत विजापूर नाका पोलिस ठाण्यामध्ये फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल झाला होता. मारहाण करून विकी हा त्याच्या साथीदारासह फरार झाला होता.

विजापूर नाका पोलिसांनी विकी याची माहिती काढल्यानंतर तो पुण्यात असल्याची माहिती मिळाली. विकी आणि त्याचा साथीदार संदीप गायकवाड (रा. सेटलमेंट, सोलापूर) याला पुण्यातून ताब्यात घेऊन सोलापूर मध्ये आणले आहे. विकी याच्यावर पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये खंडणी, मारहाण करणे, शासकीय कामामध्ये अडथळा निर्माण, लुटमार करणे, जीवे मारण्याचा प्रयत्न करणे अशा स्वरूपाची गंभीर गुन्हे दाखल आहेत.

ही कारवाई विजापूर नाका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक उदयसिंह पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक शितलकुमार कोल्हाळ, सहायक फौजदार संजय मोरे, पोलिस हवालदार राजकुमार तोळणूरे, श्रीरंग खांडेकर, पोलिस नाईक शिवानंद भिमदे, अनिल गवसाने, पिंटू जाधव, अतिष पाटील, इम्रान जमादार, लखन माळी यांनी बजावली.

Back to top button