केमिकलपासून डिझेलनिर्मिती करणारी सातजणांची टोळी गजाआड | पुढारी

केमिकलपासून डिझेलनिर्मिती करणारी सातजणांची टोळी गजाआड

सोलापूर ; पुढारी वृत्तसेवा : बेकायदेशीररीत्या केमिकलपासून डिझेलनिर्मिती व विक्री करणार्‍या सातजणांच्या टोळीला शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गजाआड केले. त्यांच्याकडून एक डिझेल टँकर, तीन आकांक्षा ट्रॅव्हलच्या बसेस व पालघर येथून इतर साहित्य असा 17 कोटी 20 लाख 90 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिस उपायुक्त बापू बांगर यांनी दिली.

तानाजी काशीनाथ ताटे (रा. मानेगाव, ता. बार्शी), युवराज प्रकाय प्रबळकर (रा. पंचशील नगर, वैराग, ता. बार्शी), तसेच आकांक्षा ट्रॅव्हर्लचे मालक अविनाश सदाशिव गंजे (रा. चडचणकर अपार्टमेंट, भवानी पेठ), सुधाकर सदाशीव गंजे (वय 44, रा. अवंतीनगर, पूना नाका), मॅनेजर श्रीनिवास लक्ष्मण चव्हाण (रा. अभिषेक नगर) व बसचा चालक हाजू लतीफ शेख (रा. कौडगाव, उस्मानाबाद) व हिमांशू संजय भूमकर (वय 21 रा. भुमकर कॉलनी, बार्शीरोड, वैराग) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

शहर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय साळुंखे यांना गोपनीय माहिती मिळाली की, सोलापुरातील पुणे-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर एका हॉटेलच्या उत्तरेस आकांक्षा लॉजिस्टिक (ट्रॅव्हलर्स) या खासगी बस पासिंगच्या मोकळ्या जागेत काहीजण डिझेलसारखा ज्वलनशील पदार्थ आणून एका बसमधून दुसर्‍या बसमध्ये ( एमएच 25/एके 2417 मधून एन एल 01/बी 1697) भरत होते.

यावेळी शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तेथे छापा टाकला. यावेळी पोलिसांनी एक डिझेलचा टँकर, आकांक्षा ट्रॅव्हर्ल्सच्या तीन बसेस असा 1 कोटी 1 लाखाचा मुद्देमाल जप्त केला.

या प्रकरणी फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याचा तपास गुन्हे शाखेचे पो.नि. साळुंखे यांच्याकडे देण्यात आला. या गुन्ह्याच्या तपासादरम्यान आरोपी हिमांशु भुमकर याने डिझेल सारखा ज्वलनशील पदार्थ हा टँकरमधून (क्र. एमएच25/एके 2417) पाठविल्याचे निष्पन्न झाले. तेव्हा पोलिसांनी त्याचा शोध घेवून अटक केली.

त्याची चौकशी करता त्याने हा डिझेलसारखा ज्वलनशील पदार्थ खुपरी (ता. वाडा, जि. पालघर) येथील साई ओम पेट्रो स्पेसिलीटिज लिमीटेड या कंपनीतून आणला असल्याचे सांगितले. पोलिस उपायुक्त बापू बांगर यांच्यासमवेत निरीक्षक साळुंखे व गुन्हेशाखेची दोन पथके पालघर येथे रवाना झाली. तेथे साई पेट्रो स्पेसिलीटीज लिमीटेड या कंपनीस रिसायकल ऑईल व्यवसायाचा परवाना असताना ते केमिकलच्या सहाय्याने डिझेलनिर्मिती करून विक्री करीत असल्याचे उघडकीस आले.

या कंपनीत वेगवेगळ्या रासायनिक द्रव्य पदार्थांचा साठा व बेकायदेशीरपणे भेसळ सुरू असल्याचे निष्पन्न झाले. या ठिकाणाहून कंपनीची मशीनरी, मालमत्ता व जमीन अशा प्रकारे 16 कोटी 19 लाख 90 हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल पथकाने जप्त केला.

या गुन्ह्यात पोलिसांनी पालघर येथील कंपनीत कोणकोणते केमिकल कोठून आणले याचा शोध सुरू आहे. या गुन्ह्यात पोलिसांनी 7 जणांना अटक केली असून सर्व आरोपींना पोलिस कोठडी मिळाली आहे.

Back to top button