पवार-मोहिते-पाटील समर्थकांमध्ये सोशल वॉर | पुढारी

पवार-मोहिते-पाटील समर्थकांमध्ये सोशल वॉर

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा :  राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी रविवारी (दि. 7) पंढरपूर येथे झालेल्या शेतकरी मेळाव्यात अकलूजची चमक-धमक मावळल्यासारखी वाटत असल्याचे वक्तव्य केले होते. त्या वक्तव्यावरून पवार-मोहिते-पाटील समर्थकांमध्ये सोशल वॉर सुरू झाले आहे. त्याचे उत्तर म्हणून मोहिते-पाटील समर्थकांनी आ. रोहित पवार यांना अनावृत्त पत्र लिहून ते सोशल मीडियावर व्हायरल केले आहे.

रविवारी पंढरपूरच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर शेतकरी मेळावा झाला. या मेळाव्यात विठ्ठल परिवारातील प्रमुख घटक असलेल्या अभिजित पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यावेळी आ. रोहित पवारही उपस्थित होते. त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की, मी आणि पवार साहेब सकाळी बारामतीहून हेलिकॉप्टरने येत असताना जिथं कुठं गेलो तिथं पवार साहेब सांगत होते, हे गाव आहे, ते गाव आहे, हा अकलूज कारखाना आहे. पूर्वी खरं तर अकलूजला वेगळी एक चमक होती, धमक होती. पण, हेलिकॉप्टरमधूनसुद्धा ती धमक कुठंतरी मावळल्यासारखी तिथं मला वाटली, असे त्या भर सभेत सांगत मोहिते-पाटील यांना डिवचण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. आ. पवारांच्या त्या वक्तव्यावरुन सोशल मीडियात सोशल वॉर सुरू झाले आहे. मोहिते-पाटील समर्थकांनी आ. पवार यांना अनावृत्त पत्र लिहिले आहे.

त्या पत्रामध्ये अकलूजची चमक आणि धमक अजूनही तीच आहे, तोच दरारा, तोच रुबाब असल्याचाही उल्लेख केला आहे. 2009 ला माढा मतदारसंघाची पुनर्रचना झाली. रणजितसिंह यांचे काम, नेतृत्व लोकांमध्ये असलेली वलयांकित प्रतिमा, पर्यायाने या मतदारसंघात मोहिते-पाटील यांची पकड पाहता या मतदारसंघावर रणजितसिंहांचा हक्क होता. तो साडून मोहिते-पाटीलांनी तुमच्या उमेदवारीचे स्वागतच केले व तुम्हाला जिवाचे रान करून निवडून आणले.
त्यावेळी आपण माढा मतदारसंघाचा चेहरामोहरा विकासाने बदलून टाकू, बारामतीसारखे माढ्याचे नंदनवन करू, असा लोकांना विश्वास दिला. प्रत्यक्षात विकास तर दूरच राहिला.

फक्त सोलापूरकरांचा भ्रमनिरास झाला. 2014 ला परत माढ्यातून उभारण्यासाठी कानोसा घेतला. मोदी लाटेचा धसका घेतला, माघार घेतलीत. तेवढ्या मोदी लाटेत विजयसिंह मोहिते-पाटील स्वकर्तृत्वावर निवडून आले. त्यांच्यामुळे राष्ट्रवादीची पत राखली. विचारा साहेबांना मोहिते-पाटीलांंचा दरारा, असेही त्या पत्रात म्हटले
आहे.

आ. रोहित पवारांना सल्ला

मोहिते-पाटलांच्या कर्तृत्वाचा आलेख अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. तुम्ही राजकारणात यायच्या अगोदर तीन पिढ्या मोहिते-पाटील यांनी लोकांच्या कल्याणाकरिता, समाजकारणाकरिता खर्ची घातल्या आहेत. तुम्ही सोलापूर जिल्ह्याचा इतिहास तपासून पाहा. उगाच लहान तोंडी मोठा घास घेऊ नका. अकलूजची चमक व धमक आता पूर्वापेक्षा तेज आहे. त्यामुळे मोहिते-पाटील यांच्यावर टीका करताना हजारवेळा विचार करा, असा सल्लाही आ. पवारांना त्या पत्रातून दिला आहे.

Back to top button