पंढरपूर : पुढारी वृत्तसेवा : मराठा आरक्षणासाठी पंढरपुरात मराठा समाज आक्रमक झाला असून, आंदोलकांनी केंद्र व राज्य सरकारच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे शनिवारी दहन करून शिंदे आणि फडणवीस सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली.
मराठा आरक्षणासाठी दाखल करण्यात आलेल्या पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्याने मराठा समाजाला धक्का बसला आहे. पंढरपूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शनिवारी सकाळी 11 वाजता मराठा समाज व मराठी क्रांती मोर्चाच्या वतीने केंद्र व राज्य सरकारचा निषेध करून घोषणाबाजी करण्यात आली.
केंद्र व राज्य सरकारच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. यावेळी मराठा समाज राज्य समन्वयक रामभाऊ गायकवाड म्हणाले की, मागील सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षणासाठी आश्वासन दिले होते. सत्ता आल्यानंतर सहा महिन्यांत आरक्षण न दिल्यास राजकीय संन्यास घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले होते. मात्र अद्यापही मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही. आम्हाला जेलमध्ये टाका किंवा गोळ्या घाला. जोपर्यंत मराठा समाजास आरक्षण देणार नाही तोवर आषाढी यात्रेची शासकीय महापूजा मुख्यमंत्री यांना करू देणार नाही, असा इशाराही गायकवाड यांनी दिला. या वेळी संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष किरण घाडगे, पंढरपूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभा अध्यक्ष संदीप मांडवे, स्वागत कदम, धनाजी मोरे, आकाष पवार, नीलेश गंगथडे, अॅड. राजेश भादुले आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.