सोलापूर महापालिकाकडून मे महिन्यात सर्वंकष सर्वेक्षण; एकूण १२५ पथके तैनात | पुढारी

सोलापूर महापालिकाकडून मे महिन्यात सर्वंकष सर्वेक्षण; एकूण १२५ पथके तैनात

सोलापूर , पुढारी वृत्तसेवा : सोलापूर महापालिका प्रशासनाच्यावतीने मिळकत नळ कनेक्शन यासह विविध घटकांचा सर्वंकष असा सर्व्हे मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिका आयुक्तांनी दिली.

महापालिकेच्यावतीने सोलापूर शहरातील सर्व मिळकती, नळ कनेक्शन, ड्रेनेज कनेक्शन, प्रॉपर्टी कार्ड, बांधकाम परवाना, वापर परवाना यासह इतर सर्व माहिती या सर्वेक्षण अंतर्गत संकलित करण्यात येणार आहे. घरोघरी जाऊन या सर्वेक्षणातील पथके माहिती संकलित करणार आहेत. दरम्यान, संबंधित पथकातील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्याचबरोबर सर्वेक्षण करत असताना संभाव्य येणाऱ्या अडचणी यासंदर्भात ही निर्णय घेण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले.

एकूण 125 पथके करणार सर्वेक्षण

या सर्वेक्षणासाठी एकूण 125 पथके तयार करण्यात येणार आहेत. हे पथक घरोघरी जाऊन सर्व माहिती संकलित करणार आहेत. त्यानंतर सर्व माहिती एकत्रित करतील. ही माहिती गुगल फॉर्म मध्ये भरण्यात येणार आहे. साधारणता : एक पथक रोज 40 घरांचा सर्व्हे करणार आहेत. एकूण 125 पथके हे काम पाहणार आहेत. साधारणतः तीन महिन्यात हे सर्वेक्षणाचे काम पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती महापालिकेकडून देण्यात आली.

मिळकतदारांना पथक विचारणार ही माहिती

या सर्वेक्षणासाठी घरोघरी आलेल्या पथकाकडून संबंधित मिळकतदारांना आवश्यक असलेली असलेली माहिती विचारणार आहेत. त्यामध्ये मिळकत कर नोंद आहे का ? बांधकाम परवाना आहे का? वापर परवाना आहे का ? नळ कनेक्शन आहे का? त्यामध्ये घरगुती की व्यवसायिक ? ड्रेनेज कनेक्शन आहे का? या संदर्भातली माहिती कर्मचारी जाणून घेणार आहेत. ती माहिती गुगल फॉर्म मध्ये संबंधित पथक भरणार आहे. हा गुगल फॉर्म तयार करण्याचं काम संगणक विभाग करणार आहे.

मिळकतदारांनी कागदपत्रे दाखवून पथकास सहकार्य करावे

सर्वेक्षण पथकाने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे व माहिती मिळकतदारांनी द्यावयाची आहे. ही माहिती देतानाच टॅक्स पावती, बांधकाम परवाना, वापर परवाना आदी महत्त्वाची कागदपत्रे ही या पथकास दाखविणे गरजेचे आहेत. जर कागदपत्र दाखवले नाहीत तर संबंधित बाब अनधिकृत असल्याचे स्पष्ट होणार आहे. त्यामुळे हे टाळण्यासाठी आलेल्या पथकास आवश्यक ती कागदपत्रे दाखवावी. त्याचा फोटो पथक घेईल. यासाठी सर्वांनी महापालिकेच्या पथकास सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले.

Back to top button