सोलापूर : कांदा अनुदानाला सातबारा नोंदीची अडचण | पुढारी

सोलापूर : कांदा अनुदानाला सातबारा नोंदीची अडचण

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा :  कांदा अनुदान मागणीसाठीच्या अर्जाला शेतकर्‍यांनी कांदा पिकाची नोंद असलेला संगणकीय सातबारा जोडण्याची अट ठेवली आहे, मात्र कित्येक कांदा उत्पादक शेतकर्‍यांच्या उतार्‍यावर कांदा पीक नोंदवलेच नसल्याने ते अनुदान मागणी करण्यापासून वंचित राहत आहेत. याबाबत माजी कृषिमंत्री दादा भुसे यांनी हा प्रश्न सोडवू असे आश्वासन दिले होते. मात्र शासनाने अद्याप आदेश दिला नाही.

फेब्रुवारी व मार्च महिन्यात विक्री झालेल्या कांद्याला अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यासाठी अनुदान मागणी अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे. मात्र या अर्जासोबत कांदा पीक नोंदवलेला संगणकीय सातबारा जोडणे अनिवार्य केले आहे. बहुतांश शेतकर्‍यांना अद्याप ऑनलाईन पीकपाणी नोंदवण्याची पद्धत पूर्णपणे माहीत नाही. त्याचबरोबर काही शेतकर्‍यांकडे मोबाईल उपलब्ध नाही. यामुळे कित्येक शेतकर्‍यांच्या शेतात कांदा असूनही सातबार्‍यावर त्याची नोंद नाही. या अटीमुळे बहुतांश शेतकरी अनुदानापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या तीन दिवसांत दोन हजार शेतकर्‍यांनी मागणी अर्ज दाखल केले आहेत. समितीकडे फेब्रुवारी व मार्च महिन्यांतील कांदा विक्री करणार्‍या शेतकर्‍यांचा आकडा पाहता अर्ज भरणार्‍यांची संख्या अत्यल्प आहे.

Back to top button