राष्ट्रीय महामार्गांच्या जाळ्याने सोलापूर देशाच्या नकाशावर झळकणार | पुढारी

राष्ट्रीय महामार्गांच्या जाळ्याने सोलापूर देशाच्या नकाशावर झळकणार

सोलापूर;  पुढारी वृत्तसेवा :  सोलापूर जिल्ह्यामध्ये 917.41 कि.मी. इतकी राष्ट्रीय महामार्गांची लांबी येते. हे सर्व रस्ते पूर्ण झाल्यानंतर सोलापूर जिल्हा हा राज्यालाच नव्हेतर देशाच्या नकाशावर दिमाखदार पध्दतीत झळकणार आहे. दोन तासांमध्ये आपण कोणत्याही एका टोकापासून दुसर्‍या टोकापर्यंत पोहोचू शकतो. सोलापूर शहरापासून पुणे साडेतीन तासांत, हैदराबाद चार तासांत, औरंगाबाद पाच तासांत, बंगळुरु व नागपूर दहा तासांत व मुंबई पाच ते सहा तासांत पोहोचू शकेल. त्यामुळे जिल्ह्याच्या विकासाला मोठया प्रमाणावर चालना मिळेल व बाह्य गुंतवणी मोठ्या प्रमाणावर येतील.

सोलापूर-विजयपूर राष्ट्रीय महामार्ग क्र. 52 हा 110 कि.मी. (महाराष्ट्रातील लांबी – 39 कि.मी. व कर्नाटकातील 71 कि.मी) असून या महामार्गासाठी एकूण प्रकल्पाच्या बांधकामासाठी व भूसंपादनासाठी रक्कम 1979.44 कोटी रुपये इतकी आहे. या महामार्गामध्ये 4 मोठे पूल, 35 छोटे पूल, 2 रेल्वे उड्डाणपूल, 26 छोटे व मोठे भुयारी मार्ग, 2 विश्रांतीस्थानके असून या महामार्गावर एकूण 31.48 कि.मी.चा सेवा रस्ता आहे तसेच महामार्गावर दोन टोलनाके नांदणी आणि तिडागुडी याठिकाणी आहेत. या महामार्गाचे बांधकाम सन 2018 मध्ये सुरु झाले असून सन 2022 मध्ये पूर्ण झालेले आहे व वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला आहे. सोलापूर – विजयपूर राष्ट्रीय महामार्गाचा एक विश्वविक्रम नोंदविण्यात आलेला आहे तो म्हणजे 18 तासांमध्ये 25 कि.मी.चा डांबरी रस्ता बनविण्यात आलेला आहे व त्याची नोंद लिमका बुकमध्ये झालेली आहे. हीसुध्दा एक सोलापूर जिल्ह्यासाठी व महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे.

सांगली-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्र. 166 मधील बोरगाव – 1 वाटंबरे (बाह्यवळण रस्त्यासह) लांबीच्या चौपदरीकरणाची एकूण लांबी ही 52 कि.मी. (सांगलीतील लांबी 28 कि.मी. व सोलापुरातील लांबी 24 कि.मी.) असून या महामार्गासाठी एकूण प्रकल्पाच्या बांधकामासाठी व भूसंपादनासाठी रक्कम 2073.63 कोटी रुपये इतकी आहे. या महामार्गामध्ये 4 मोठे पूल, 5 छोटे पूल, 20 छोटे व मोठे भुयारी मार्ग, 2 विश्रांतीस्थानके असून या महामार्गावर एकूण 9.92 कि.मी.चा सेवा रस्ता आहे तसेच महामार्गावर एक टोलनाका अनकढाळ याठिकाणी आहे. या महामार्गाचे बांधकाम सन 2019 मध्ये सुरु झालेले असून एकूण 52 कि.मी.चे आजतागायत पूर्ण असून माहे फेब्रुवारी 2023 अखेर स्वतंत्र अभियंता यांच्याकडून पूर्णत्वाचा प्रमाणपत्र मिळाले आहे. सांगली – सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्र. 166 मधील वाटंबरे ते मंगळवेढा चौपदरीकरणाची एकूण लांबी हे 45.60 कि.मी. असून या महामार्गासाठी एकूण प्रकल्पाच्या बांधकामासाठी व भूसंपादनासाठी रक्कम 2250.17 कोटी रुपये इतकी आहे. या महामार्गामध्ये 2 मोठे पूल, 6 छोटे पूल, 20 छोटे व मोठे भुयारी मार्ग, 1 रेल्वे उड्डाणपूल, 1 विश्रांतीस्थानके असून या महामार्गावर एकूण 28.51 कि.मी.चा सेवा रस्ता आहे. या महामार्गाचे बांधकाम सन 2018 मध्ये सुरु झालेले असून एकूण 45.60 लांबी आजतागायत पूर्ण झालेली आहे. या प्रकल्पामध्ये नवा विक्रम म्हणजे रेल्वे उड्डाणपुलाचे 14 गर्डर लॉचिंगचे काम अवघ्या 12 तासांमध्ये करण्यात आलेला आहे.

सांगली – सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्र. 166 मधील मंगळवेढा – सोलापूर 55.80 कि.मी. असून या महामार्गासाठी एकूण प्रकल्पाच्या बांधकामासाठी व भूसंपादनासाठी रक्कम 2272.54 कोटी रुपये इतकी आहे. या महामार्गामध्ये 2 मोठे पूल, 1 छोटा पूल, 17 छोटे व मोठे भुयारी मार्ग, 1 विश्रांतीस्थानक असून या महामार्गावर एकूण 18.15 कि.मी.चा सेवा रस्ता आहे. या महामार्गाचे बांधकाम सन 2019 मध्ये सुरु झालेले असून एकूण 55.80 लांबी आजतागायत पूर्ण आहे.

Back to top button