सोलापूर : नाशिकच्या सराफाला 19 कोटी रुपयांना फसविणार्‍या बिल्डरला अटक | पुढारी

सोलापूर : नाशिकच्या सराफाला 19 कोटी रुपयांना फसविणार्‍या बिल्डरला अटक

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा : नाशिकच्या सराफाला 19 कोटी रुपयांना फसविणार्‍या बिल्डरला अखेर सोलापूर पोलिसांनी बेड्या ठोकल्या. मुंबई उच्च न्यायालयात तारखेच्या सुनावणीसाठी आल्यानंतर सोलापूर आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कारवाई करीत बिल्डरला ताब्यात घेतले.

अमोल सुरेश यादव (रा. युनिटी आयकॉन अपार्टमेंट, फ्लॅट नं. 21, जुळे सोलापूर, सोलापूर) असे अटक करण्यात आलेल्या बिल्डरचे नाव आहे. याबाबत विजापूर नाका पोलिस ठाण्यात प्रशांत आत्माराम गुरव (वय 46, रा. फ्लॅट नं. 17/18, रामराज्य संकुल, काळाराम मंदीर, उत्तर दरवाजा, पंचवटी, नाशिक) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन 4 ऑगस्ट 2021 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमोल यादवला मंगळवारी सोलापूर येथील न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यास 4 दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.

प्रशांत गुरव हे सराफ असून नाशिक येथील सराफ बाजारात त्यांचे ए एस गुरव अ‍ॅन्ड सन्स या नावाचे सराफ दुकान आहे. तसेच गुरव यांची नाशिकमध्ये सोने रिफायनरीची दोन दुकाने आहेत. सन 2013 मध्ये सराफ प्रशांत गुरव यांच्या दुकानात आलेल्या अमोल यादव याने आपली ओळख बांधकाम व्यावसायिक अशी सांगत पत्नीला काही दागिने खरेदी केली. तेथून गुरव यांच्याशी यादव याने चांगलीच ओळख वाढवून कौटुंबिक संबंध निर्माण केले. त्यानंतर यादवाने आपल्या बांधकाम व्यवसायात पैसे गुंतविण्यासाठी गुरव यांना प्रवृत्त केले. यादवच्या आमिषाला बळी पडत गुरव यांनी त्यांची नाशिक येथील जमिन विकून तसेच अनेक लोक व नातेवाईकांकडून उसने पैसे घेऊन वेळोवेळी 19 कोटी 7 लाख 78 हजार 570 रुपये दिले. तसेच गुरव यांच्या बनावट सह्यांच्या आधारे बनावट कागदपत्र तयार करून इमारतीमधील फ्लॅट विक्रिचे व्यवहार केलेत म्हणून गुरव यांच्या फिर्यादीवरुन 4 ऑगस्ट 2021 रोजी विजापूर नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या गुन्ह्याचा तपास आयुक्‍तालयातील आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरु असून गेल्या 20 महिन्यापासून संशयित आरोपी अमोल यादव हा पोलिसांना गुंगारा देत फरार होता. या गुन्ह्यातील फिर्यादी सराफ प्रशांत गुरव हे गुन्हा दाखल झाल्यापासून अनेकदा सोलापूरात येऊन पोलिसांकडे तपासाबाबत विचारणा करीत होते. गुरव यांनी याबाबत राज्याचे तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे अनेकदा निवेदने व स्मरण पत्रे पाठवून संशयित आरोपींचा शोध घेऊन त्यास अटक करण्याची मागणीदेखील केलेली आहे. परंतु, फरार यादवचा शोध काही लागत नव्हता. त्यामुळे पोलिसांच्या तपासावर प्रश्‍नचिन्ह उभारले होते.

त्यामुळे आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस यादवच्या मागावरच होते. ‘पुढारी’ ने देखील यादव मिळून येत नसल्याबाबत वृत्तमालिका लावून यादवचे कारनामे उघड केले होते. अमोल यादव हा मुंबई उच्च न्यायालयात तारखेच्या सुनावणीसाठी येणार असल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. त्यावरुन पोलिसांनी उच्च न्यायालय परिसरात सापळा लावून यादव यास सोमवारी ताब्यात घेतले व सोलापुरात आणले. मंगळवारी दुपारी यादव यास सोलापुरातील न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यास 4 दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजेंद्र बहिरट पुढील तपास करीत आहेत.

Back to top button