सोलापूर : ‘वर्गणी नको, पुस्तके द्या’: बार्शीतील मंडळाचा उपक्रम | पुढारी

सोलापूर : 'वर्गणी नको, पुस्तके द्या': बार्शीतील मंडळाचा उपक्रम

बार्शी; पुढारी वृत्तसेवा : बार्शीत महापुरुषांच्या जयंतीच्या निमित्ताने विविध विधायक व सामाजिक उपक्रम राबवण्याकडे तरुणांचा कल वाढताना दिसत आहे. शहरातील तरुणांकडून अनावश्यक खर्च टाळून एक वेगळा आदर्श देण्याचा प्रयत्न केला जात आहे.

महापुरुषांच्या उच्च विचारांना समोर ठेवून कामकाज केले जात आहे. सुमित खुरंगळे व त्यांच्या मंडळातील इतर सहकाऱ्यांकडून ‘आम्हाला वर्गणीची रक्कम नको, तर पुस्तके द्या’ अशी हाक दिली गेली आहे. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवाच्या निमित्ताने हा उपक्रम गत वर्षापासून जपला जात आहे व स्पर्धा परीक्षेची पुस्तके द्या, असे सांगितले जाते. जमा झालेली पुस्तके स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांना दिली जाणार आहेत.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती नजीक येऊन ठेपली आहे. या जयंतीची जय्यत तयारी सुरू आहे. बार्शीत जयंती उत्सव मंडळांकडून विविध कार्यक्रमांची आखणी करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर सुभाषनगर परिसरात सुमित खुरंगळे या तरुणाने पुढाकार घेत दरवर्षी डॉ. आंबेडकर यांची जयंती अनोख्या पद्धतीने साजरी करण्याचा संकल्प सोडला आहे. जयंतीच्या निमित्ताने पुस्तके भेट करावीत. वह्या, पुस्तके, पेन असे शालेय साहित्य भेट स्वरूपात द्यावे, असे आवाहन खुरंगळे यांनी केले आहे.

Back to top button