एसटी बसला जेसीबीचा दे धक्‍का..; बस बंद पडल्‍याने प्रवाशांना मनस्‍ताप | पुढारी

एसटी बसला जेसीबीचा दे धक्‍का..; बस बंद पडल्‍याने प्रवाशांना मनस्‍ताप

पापरी ; पुढारी वृत्तसेवा एसटी बसला चक्क जेसीबीच्या साहाय्याने धक्‍का मारण्याची वेळी आज प्रवाशी आणि विद्यार्थ्यांवर आली. मात्र धक्‍का मारूनही बसगाडी चालू न झाल्याने पापरी परिसरातील ग्रामस्थांची आणि महाविद्यालयीन विद्यार्थिनींची आजश (शनिवार) 18 मार्च रोजी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास मोठी गैरसोय झाली. या अगोदरही सकाळी कॉलेजच्या जाण्याच्या वेळी गाडी बंद पडण्याच्या घटना घडल्या आहेत. ग्रामीण भागात सोडण्यात येणाऱ्या बस गाड्या या सुस्‍थितीती असणाऱ्याच गाड्या सोडाव्यात अशी मागणी विद्यार्थी व ग्रामस्थांतून होत आहे. दुपारपर्यंत सदर बसगाडी गावच्या वेशीत दुरावस्थेत उभी होती.गावाला फक्त एकच बसगाडी उपलब्ध आहे. तिचीही अशी अवस्था असल्‍याने प्रवाशांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

खंडाळी ता. मोहोळ येथून दररोज सकाळी साडेसहा वाजण्याच्या दरम्यान खंडाळी-मोहोळ ही मुक्काम बसगाडी पापरी कोन्हेरी,सारोळे मार्गे मोहोळला नियमित धावते, त्यात महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थिनी,ग्रामस्थ तसेच भाजीपाला आणि इतर व्यवसायिक प्रवास करतात. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ही गाडी एकदम सोयीची ठरते, पण कधी कधी ही गाडी मुक्कामी येत नाही, तर आठवड्यातून दोनवेळा तरी विविध कारणास्तव ही बस बंद पडत असल्याचा अनुभव ग्रामस्थांना व विद्यार्थ्यांना येतो आहे.

आज (शनिवार) सकाळी सात वाजण्याच्या सुमारास खंडाळीहून निघालेली मुक्काम बसगाडी MH06,S 8316 ही पापरी येथे आल्यावर बंद पडली. चालक वाहक यांनी प्रयत्न करूनही ती चालू होईना. गाडीला धक्का मारायलाही सकाळी हवे तेवढे मनुष्यबळ उपस्थित न्हवते. दरम्‍यान यावेळी तेथून कामासाठी चाललेल्या एका जेसीबीची मदत घेऊन बसला दोन ते तीन वेळा धक्का मारून बस चालू करण्याचा प्रयत्न केला गेला, मात्र बस सुरू झाली नाही. अखेर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी वैतागुन बस मधून उतरून निघून जाणे पसंत केले.

सध्या परीक्षेचे दिवस सुरू आहेत, शाळकरी मुले, महाविद्यालयीन विद्यार्थिनी यांची गैरसोय टाळावी,शाळेत कॉलेजमध्ये त्यांना वेळेत पोहचून त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी राज्य परिवहन मंडळाने ग्रामीण भागात सोडण्यात येणाऱ्या गाड्या सुस्थितीत असणाऱ्या सोडाव्यात अशी मागणी पालकांमधून होत आहे.

शासनाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त वय वर्षे 75 पूर्ण असलेल्या प्रवाशांना मोफत बस प्रवास सुरू केला आहे, 17 मार्च पासून महिला सन्मान योजने अंतर्गत महिलांना 50 टक्के सवलत दिली आहे, असे असले तरी प्रवास करण्यासाठी असणाऱ्या बसगाड्या या सुस्थितीतील नसल्यास त्यापासून त्रास होत असेल तर या सवलती काय कामाच्या असा संतप्त सवालही ग्रामस्थांतून विचारला जात आहे.
या संदर्भात मोहोळ बस स्थानकाशी संपर्क केला असता,तेथील कंट्रोलर सूर्यकांत उन्हाळे म्हणाले, बसगाड्या या सोलापूरहून येतात, तेथील वरिष्ठांना बसगाड्या बंद पडण्याच्या अडचणी संदर्भात आम्ही वारंवार सूचना देण्यात आल्‍या आहेत. लॉकडाऊन, कर्मचारी संप यामुळे गाड्या जास्त दिवस एकाच जागी उभ्‍या राहिल्या होत्‍या. त्‍यामुळे गाड्यांमध्ये बिघाड निर्माण होत आहे.

पापरी येथे बंद पडलेल्या बसचे चालक हनुमंत घोडके यांच्याशी संवाद साधला असता, ते म्हणाले, पापरी येथे नेहमी प्रमाणे गाडी आली तेव्हा अचानक इयर लॉकचा प्रॉब्लेम आला. त्यामुळे इंजिनपर्यंत डिझेल पोहचत नसल्याने गाडी सुरू होईना, संबंधीतांना कळविले असून, दुरुस्तीसाठी मॅकॅनिकल पाठवून देत असल्‍याचे सांगण्यात आले आहे.

हेही वाचा : 

Back to top button