हुंडा मागणीचा ट्रेंड बदलला; सोने, चारचाकी मागणीचा नवा फॅड | पुढारी

हुंडा मागणीचा ट्रेंड बदलला; सोने, चारचाकी मागणीचा नवा फॅड

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : वधू-वराच्या लगीनघाईत सोन्याच्या वाढत्या बाजारभावाने वधू-वर पक्षाची धावपळ उडाली असून बदलत्या काळानुसार लग्न थाटात करताना सर्वसामान्यांवर फार मोठा आर्थिक बोजा वाढला आहे. अनेकांनी आपली हौसमौज करण्यासाठी सोन्याच्या दागिन्यांकडे आपला मोर्चा वळवला आहे. यातच आपल्या लाडक्या मुलीचा संसार सुखाचा व्हावा म्हणून मोठमोठ्या वस्तूंसह चारचाकी देण्याचेही फॅड वाढले आहे.

सर्वसामान्यांकडून आपल्या मुला-मुलींचे लग्न चांगले व्हावे यासाठी मोठा खर्च केला जातो. यात कपडे, संसारोपयोगी वस्तू, गाड्या, वाजंत्री, मांडव, कार्यालय व जेवण, लग्नपत्रिका यावर वधूपक्षाचा मोठा खर्च होत असतो. त्याच तुलनेत वरपक्षदेखील काही खर्च करतो. गेल्या पाच-दहा वर्षांत वाढत्या महागाईने लग्नकार्य करताना अनेक सर्वसामान्य कुटुंब कर्जबाजारी होतात. सोन्याचे भावही गगनाला भिडले आहेत. त्यावेळी एक-दोन ग्रॅमचे दागिने काहीसे मिळत नव्हते; परंतु बदलत्या बाजारपेठा व नवनवीन कमी किंमतीच्या भरगच्च डिझाईन व आकाराने मोठे दिसणारे सोन्याचे पॉलिश असलेले दागिने बाजारपेठेत मिळत आहेत.

सोन्याच्या वाढत्या बाजारभावाने सर्वसामान्य नागरिक या दागिन्यांकडे वळले आहेत. एकीकडे लग्नसमारंभामध्ये मोठमोठे सजावट व देखावे आणि सत्कार समारंभ यावरसुद्धा मोठ्या प्रमाणात खर्च केला जात असल्यामुळे आता लग्नाचा खर्च लाखोंची उड्डाणे गाठत असल्याचे दिसून येत आहे.

हुंडा नको मामा, फक्त मुलगी आणि सोनं द्या…

सध्या लग्नसराई सुरू असून लग्नकार्य मोठ्या थाटात करुन द्यावे, असा आग्रह अनेक वरपक्षाकडून केला जातो. बदलत्या कार्यक्रम पद्धतीत हुंडा संस्कृती काहीशी कमी झाली. आता हुंडा नको, परंतु लग्न चांगले करुन द्या, जमलं तर तुमच्या मुलीला दागिने करा म्हणत आजही अनेक विवाह ग्रामीण भागात साजरे होत आहेत. सर्वसामान्यांकडून आपल्या मुला-मुलींचे लग्न चांगले व्हावे यासाठी मोठा खर्च केला जातो.

Back to top button