सोलापूर : पापरीत बिबट्या सद्ष्‍य प्राण्याचे दर्शन; ग्रामस्‍थांत भीती | पुढारी

सोलापूर : पापरीत बिबट्या सद्ष्‍य प्राण्याचे दर्शन; ग्रामस्‍थांत भीती

पापरी; पुढारी वृत्तसेवा पापरी गावालगत मानवी वस्तीत दोन बिबट्या सद्ष्‍य प्राण्यांचे दर्शन झाले आहे. घरासमोरील पाळीव कुत्र्याच्या पिलाला एका प्राण्याने उचलून नेल्याने पापरी ग्रामस्थांत घबराट पसरली आहे. चक्क गावालगत हे प्राणी आल्याने महिलावर्गात प्रचंड भीती निर्माण झाली आहे.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, काल (मंगळवार) सायंकाळी पावणेआठ वाजण्याच्या सुमारास बाळासाहेब टेकळे यांची गावाजवळच प्राथमिक शाळेलगत शेत आहे. या शेतात ऊस पिकाचे दार मोडण्यासाठी शेतमजूर सचिन माने हा गेला असता, त्याला प्रथम एका बिबट्या सदृश्य प्राण्याचे दर्शन घडले. त्याने लगेच बाळासाहेब टेकळे यांना आवाज दिला. यावेळी वस्तीवरचे शेतकरी काठ्या घेऊन धावत आले असता, सदर प्राणी धावत वस्‍तीमागे दबा धरून बसला असलेला पशुपालक गणेश फराटे, सुहास काजळे, दाजी डोंगरे यांनी पाहिले.

आरडाओरड्यामुळे तसेच टॉर्च घेऊन त्याच्या मागे धावत सुटल्यावर तो केळीच्या पिकात अंधारात निघून गेला. तोपर्यंत टेकळे यांच्या वस्तीपासून थोड्या अंतरावर असलेल्या सुनंदा लोंढे यांच्या वस्तीवर या बिबट्या सदृश्य दोन प्राण्यांनी एका कुत्र्याच्या तीन महिन्याच्या पिलाला तोंडात धरून पळवून नेताना सुनंदा लोंढे यांनी पाहिले. बिबट्या सदृश्य दोन प्राणी आणि कुत्र्याच्या पिलाला तोंडात धरलेले दृश्य पाहून सुनंदा यांचा थरकाप उडाला. त्यांनी लागलीच दार बंद करून घेतले. ते दोन्ही प्राणी पळून गेल्यावर शेजारच्या वस्तीवर गेल्या. त्यांना प्राण्याचे वर्णन विचारले असता, त्या म्हणाल्या, तो बिबट्या सारखाच आहे. त्‍याच्या अंगावर काळे मोठे ठिपके आणि तांबूस रंगाचे केस असल्‍याचे वर्णन त्‍यांनी सांगितले. .

टेकळे यांच्या शेतातील ओल्या जागेत सदर बिबट्या सदृश्य प्राण्याचे ठसे ग्रामस्थांनी मोबाईल मध्ये क्लीक करून वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना पाठविले आहेत.

दोन दिवसांपूर्वी कोन्हेरी परिसरात एका बोकडावर हल्ला झाला होता. आता तर थेट मानवी वस्तीतच सदर प्राणी येऊन पाळीव प्राणी घेऊन चालल्याने ग्रामस्थांत घबराट पसरली आहे.

हेही वाचा :

Back to top button