सोलापूर : विद्यापीठ परीक्षेचा गोंधळ सुरूच | पुढारी

सोलापूर : विद्यापीठ परीक्षेचा गोंधळ सुरूच

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा :  कोरोना पार्श्वभूमीवर मागील दोन वर्षे विद्यापीठ, महाविद्यालयांत सर्वच परीक्षा ऑनलाईन स्वरूपात पार पडल्या. यादरम्यान विद्यापीठ परीक्षा व विद्यार्थ्यांच्या गुणांना घेऊन अनेक तज्ज्ञांनी शंका उपस्थित केली होती. मात्र, आता कोरोना संसर्ग कमी झाल्यानंतर या परीक्षेचे स्वरुप ऑफलाईन वर्णनात्मक झाले असले तरी अनेक विद्यार्थ्यांना परीक्षेचे उत्तर लिहिता येत नाही. यासाठी महाविद्यालय स्तरावर विद्यार्थ्यांना परीक्षेत पास होण्यासाठी किमान गुणांसाठी प्राध्यापकांकडून उत्तरे सांगितली जात आहेत. अनेकठिकाणी महाविद्यालय कॉपीबहाद्दरांना पाठीशी घालत आहेत. एकंदरीत पाहता विद्यापीठ परीक्षेचा गोंधळ सुरुच असल्याचे दिसून येत आहे.

कोरोना काळात अभ्यासक्रम शिकवण्यापासून ते परीक्षा घेण्यापर्यंत ऑनलाईन पद्धतीचा स्वीकार केला गेला. मात्र, ऑनलाईन पद्धतीतसुद्धा कॉपीबहाद्दर मोठ्या प्रमाणावर समोर आले. त्यामुळे आता सुरू असलेल्या विद्यापीठाच्या पदवी, पदव्युत्तर ऑफलाईन परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करून महाविद्यालये विद्यार्थ्यांना कॉपीपासून रोखतील, असे वाटले होते. परंतु, काही महाविद्यालये आपल्या विद्यार्थ्यांनी परीक्षेत इतर महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांपेक्षा अधिक गुण संपादन करावेत, आपल्या महाविद्यालयातील एकही विद्यार्थी नापास होणार नाही, विद्यार्थ्यांवर कॉपी केस होणार नाही यासाठी परीक्षा केंद्रांवर महाविद्यालय शिक्षकांनीच फिल्डिंग लावली असल्याचे दिसून येत आहे.

विद्यापीठ परीक्षेत सर्रास कॉपी होत असल्याचा प्रकार उघडकीस येत आहे. कॉपीबहाद्दरांचा पर्दाफाश करण्यासाठी पुढाकार घेणार्‍यांनादेखील रोखण्यात येत आहे. इंजिनिअरिंग असो किंवा लॉचा पेपर, बी.कॉम. असो किंवा बी.एस्सी. जवळपास सर्वच अभ्यासक्रमांच्या परीक्षांमध्ये कॉपीबहाद्दर कॉपी करून चांगल्या गुणांनी पास होण्याची धडपड सुरू आहे.

Back to top button