सोलापुरी हुरड्याची चवच न्यारी; ज्वारी पीक बहरल्यामुळे हुरडा पार्टीस वेग | पुढारी

सोलापुरी हुरड्याची चवच न्यारी; ज्वारी पीक बहरल्यामुळे हुरडा पार्टीस वेग

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा :  गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या थंडीत व ढगाळ वातावरणाचा पोषक परिणाम ज्वारी पिकाच्या वाढीसाठी होत आहे. यामुळे ज्वारीची पिके बहरली असून, सोलापूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी हुरडा पार्टीस वेग आला आहे.
सोलापूर जिल्हा हा ज्वारी पिकविणारा जिल्हा म्हणून ओळखला जातो. मात्र, गेल्या दोन वर्षांत ज्वारीचे उत्पादन खर्चिक होत असल्याने पिकांची पेरणी कमी होताना दिसून येत आहे. बहुतांश शेतकऱ्यांनी ज्वारीच्या पेरणीचे क्षेत्र कमी केले असले तरी किमान कुटुंबापुरते आवश्यक ज्वारीची पेरणी मात्र केली आहे. ज्वारीच्या पिकासाठी ढगाळ वातावरण व थंडी पोषक असते. गेल्या पंधरा दिवसांत थंडीचे सातत्य कायम आहे. त्यामुळे जिल्हाभरात सर्वत्र ज्वारीची पिके बहरत असल्याचे दिसून येत आहे. काही शेतकऱ्यांनी ज्वारीला पाणी दिल्याने पिकांची वाढ जोमाने झाल्याचे चित्र दिसून येत आहे.

दरवर्षी संक्रांतीच्या दरम्यान जिल्हाभरात हुरडा पार्टीस सुरुवात होते. हुरडा आरोग्यासाठी पौष्टिक असल्याने शहरवासीयांना हुरडा पार्टीची ओढ असते. गेल्या आठ दिवसांपासून हुरडा पार्टी अनेक गावांत सुरू झाल्याचे दिसून येत आहे. महिनाभरात हुरडा पार्टीचा जोर आणखी वाढणार आहे. रविवारी व सुट्टीच्या दिवशी ग्रामीण भागात हुरडा पार्टी होताना दिसून येत आहेत. अक्कलकोट, मोहोळ, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर या तालुक्यांतील भीमा व सीना नद्यांच्या काठी हुरडा पार्टीना वेग आला आहे.

रात्रीही पेटतेय भट्टी

सोलापूर शहरातील हुरडाशौकीन दिवसभर कामात व्यस्त असल्याने त्यांच्याकडून रात्री हुरडा पार्टीचे आयोजन करण्यात येत आहे. शहरालगत असलेल्या काही गावांत शहरातील मित्रमंडळी व आप्तेष्टांसाठी रात्रीच्या वेळीही शेतकरी हुरडा पार्टीसाठी भट्टी पेटवत असताना दिसून येत आहे..

Back to top button