सांगली : पलूस तालुक्याला सावकारीचा विळखा | पुढारी

सांगली : पलूस तालुक्याला सावकारीचा विळखा

पलूस : तुकाराम धायगुडे

पलूस तालुक्यात सावकारांचा पाश दिवसेंदिवस घट्ट होत आहे. कमी भांडवलात लाखो रुपये उकळता येत असल्याने पलूस तालुक्यात गल्लोगल्ली सावकार निर्माण झाले आहेत.

कोरोना काळात अनेकांचा व्यवसाय, रोजगार बंद होता. परिणामी गरीब, शेतकरी, व्यावसायिक मुलांचे शिक्षण, विवाह, दवाखाना व इतर कौटुंबिक कारणाने अडचणीत येत आहेत. त्यांना बँका, सोसायटी, पतसंस्था यांच्या वाटा बंद झाल्यानंतर अडचणीच्या वेळी नाईलाजाने सावकारांकडे जाण्याशिवाय पर्याय राहत नाही. त्याचा गैरफायदा सावकार घेत आहेत.

दरमहा दहा ते 25 टक्क्यांपर्यंत व्याजाची वसुली करून कर्जदारांना कंगाल केले जात आहे. कर्जाच्या वसुलीसाठी दमदाटी करणे, रात्री-अपरात्री घरात घुसून शिवीगाळ, मारहाण करण्याचे प्रकार नित्याचेच आहेत. छोटे व्यावसायिक, भाजी विक्रेते, कामगार, मजूर यांच्या गळ्याभोवती सावकारीचा पाश घट्ट होत आहे.

काही सावकार मुळातच सावकार आहेत. ते स्वतः व्याजाने पैसे फिरवतात. तर काही जण इतरांना पुढे करून कमिशनवर सावकारीचा व्यवसाय करीत आहेत.

सध्या पलूस तालुक्यात 31 सावकारकी लायसन्स परवानाधारक आहेत. प्रत्यक्षात मात्र विनापरवाना सावकारांचे तालुक्यात पेव फुटले आहे. वसुलीसाठी गुंडांची फौजच असल्याने या सावकारांना कर्जदार अक्षरशः वैतागले आहेत.

सावकारांची दहशत एवढी आहे की पोलिस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध कोणी तक्रार देण्यासाठी पुढे येत नाही. पोलिसही लेखी तक्रार असल्याशिवाय कारवाई करीत नाहीत. त्यामुळे सावकारांनी धुमाकूळ घातला आहे. त्यांना पायबंद घालण्याची गरज आहे.

Back to top button