

पंढरपूर; पुढारी वृत्तसेवा : गोरगरिबांचा देव असलेल्या श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या नित्य पूजा कोरोना काळात थांबल्या होत्या. त्या नित्य पूजा देणगी मूल्य भरून आता भाविकांना करता येणार आहेत. 7 जानेवारीपासून नित्य पूजेसाठी इच्छुक भाविकांना बुकिंग करता येणार आहे. या नित्य पूजा 6 फेब्रुवारी ते 31 मार्चदरम्यान होणार असल्याची माहिती कार्यकारी अधिकारी तुषार ठोंबरे यांनी दिली.
कोरोना काळात श्री विठ्ठल-रुक्मिणीची नित्य पूजा मार्च ते एप्रिल या कालावधीत भाविकांच्या हस्ते करता आल्या नाहीत. मात्र, कोरोना निर्बंध शिथिल झाल्यानंतर नित्य पूजा उपलब्धकरून देण्यात येत आहेत. ज्या भाविकांनी यापूर्वी बुकिंग केले आहे व त्यांच्या नित्य पूजा झाल्या नाहीत, त्यांना अगोदर प्राधान्य देण्यात येत आहे. पूर्वीचे बुकिंग संपल्यानंतर पुढील कालावधीतील पूजा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी भाविकांतून होत होती. या मागणीचा विचार मंदिर समितीच्या 31 डिसेंबरच्या सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर व सदस्यांच्या बैठकीत करण्यात आला. त्यानुसार भाविकांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. बुकिंग झाल्यानंतर 6 फेबुवारी ते 31 मार्च या कालावधीत भाविकांच्या हस्ते नित्य पूजा करण्यात येणार आहेत.
श्री विठ्ठलाच्या नित्यपूजेसाठी 25 हजार रुपये, तर रुक्मिणीमातेच्या नित्यपूजेसाठी 11 हजार रुपये देणगी मूल्य निश्चित करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी मंदिर समिती व मंदिर समितीच्या संकेतस्थळाला भेट द्यावी.