सोलापूर : ताकद वाढविणारी औषध विक्री भोवली; 3 मेडिकल दुकानांवर कारवाई | पुढारी

सोलापूर : ताकद वाढविणारी औषध विक्री भोवली; 3 मेडिकल दुकानांवर कारवाई

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय तसेच अधिकृत प्रिस्क्रिप्शनशिवाय ‘मेफेनटरमाईन सल्फेट’ या ताकद वाढविणार्‍या इंजेक्शनची विक्री केल्याप्रकरणी माळशिरस तालुक्यातील तीन मेडिकल दुकानांवर अन्न आणि औषध प्रशासनाने कारवाई केली आहे. या दुकान चालकांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे औषध पैलवानांना विकल्याचे समजत असल्याने महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

अवैधपणे औषध विक्री केल्याने माळशिरस तालुक्यातील दीपक मेडिकल (अकलूज), राजलक्ष्मी मेडिकल (वेळापूर), ओमसाई मेडिकल (श्रीपूर) यांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या कुस्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. अवैधपणे विक्री करण्यात आलेले ‘मेफेनटरमाईन सल्फेट’ हे पैलवानांना विकल्याचे समोर येत आहे, तसेच हे औषध विक्री केल्यानंतर याचे रितसर रेकॉर्ड ठेवणे आवश्यक असताना रेकॉर्ड आढळलेले नाही. त्यामुळे औषध प्रशासनाचे ड्रग इन्स्पेक्टर अरुण गोडसे यांनी ही कारवाई केली.

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा अवघ्या काही दिवसांवर असताना झालेली ही कारवाई पाहता कुस्तीतील डोपिंगची कीड महाराष्ट्र केसरीपर्यंत पोहोचली की काय, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. ‘मेफेनटरमाईन सल्फेट’ हे जास्तीत जास्त 300 रुपयांना डॉक्टर विकत घेतात. या इंजेक्शनची डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय आणि चिठ्ठीशिवाय विक्री करता येत नाही. सध्या काळ्या बाजारात हे इंजेक्शन दीड हजार रुपयांना मिळते.

धैर्यशील मोहिते-पाटील यांनी केली होती तक्रार

महाराष्ट्र केसरी स्पर्धा अवघ्या काही दिवसांवर आहे. त्यापूर्वी सोलापुरात ही कारवाई करण्यात आली आहे. डोपिंगचा हा विळखा महाराष्ट्र केसरीपर्यंतही आहे, असा दावा धैर्यशील मोहिते-पाटलांचा आहे. कुस्ती जिंकण्यासाठी पैलवान या इंजेक्शन्सचा वापर करतात, अशी शंका व्यक्त करत मोहिते पाटील यांनी औषध प्रशासनाकडे लेखी तक्रार केली होती. त्याअनुषंगाने 30 डिसेंबरला या मेडीकल दुकानांचे परवाने रद्द करून त्यांना नोटिसा दिल्या होत्या. त्यांचा योग्य खुलासा न आल्याने या मेडीकल चालकाविरुध्द फिर्याद देण्याची आल्याची माहिती ड्रग इन्स्पेक्टर सचिन गोडसे यांनी दिली.

Back to top button