सोलापूर : अधिकार्‍यांतील इगो नडला, विकास अडला! | पुढारी

सोलापूर : अधिकार्‍यांतील इगो नडला, विकास अडला!

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : सर्वसामान्य लोकांच्या हितासाठी आणि सर्वांगीण विकासासाठी शासकीय यंत्रणांमार्फत विविध मूलभूत सेवासुविधा पुरविण्यासाठी शासनाकडून दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जातो. मात्र अनेक ठिकाणी शासकीय अधिकारी आणि यंत्रणांतील समन्वयाच्या अभावामुळे तसेच दुर्लक्षामुळे शासनाचा हेतू आणि उद्देश सफल होऊ शकत नाही. नेमकी तशीच परिस्थिती सार्वजनिक बांधकाम विभागात निर्माण झाली आहे. अधीक्षक अभियंता संजय माळी आणि कार्यकारी अभियंता मनोज ठाकरे यांच्यात सध्या मोठे शीतयुध्द सुरू झाले आहे. दोघांमधील ‘इगो’मुळे जिल्ह्याच्या विकासकामांना खीळ बसली आहे. विविध योजनांसाठी 15 कोटींचा निधी मिळूनही त्यांच्यातील मतभेदांमुळे ही कामे अद्याप सुरू होऊ शकली नाहीत. त्यामुळे जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार संघटनेने या दोघांचाही शासनाने बदली करावी, अशी मागणी लाऊन धरली आहे.

कोरोनामुळे मुळातच गेल्या दोन वर्षांत सार्वजनिक बांधकाम विभागाला तुटपुंजा निधी मिळाला. त्यामुळे अनेक विकासकामे अडली. 2022-23 या आर्थिक वर्षासाठी विशेष दुरुस्तीसाठी शासनाकडून जवळपास 15 ते 20 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

यामध्ये विविध शासकीय कार्यालयांच्या इमारती तसेच निवासी इमारतींची दुरुस्ती, शासकीय दवाखान्यांची दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार आहेत. दुसरीकडे रस्ते दुरुस्तीसाठीही यंदा भरघोस निधी सार्वजनिक बांधकामाला विभागाला मिळाला आहे. मात्र अधिकार्‍यांमध्ये समन्वय नसल्याने कोणती कामे घ्यायची आणि कोणत्या ठेकेदाराला द्यायची यावरून माळी आणि ठाकरे यांच्यात वितुष्ट आल्याची चर्चा आता सार्वजनिक बांधकाम विभागात रंगली आहे. दुसरीकडे ठाकरे यांनी पाठविलेली कामे माळी यांना मान्य नसतात आणि माळी यांनी सुचविलेल्या कामांत ठाकरे यांना रस नसतो.

यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाकडील कोट्यवधींची कामे रखडून पडली आहेत. जिल्ह्यातील जवळपास 1000 हजार सुशिक्षित बेरोजगारांना ही कामे करून रोजगार मिळविण्याची संधी असतानाही वरिष्ठ अधिकार्‍यांमधील ‘इगो’ प्रॉब्लेममुळे त्यांच्यावर बेरोजगार राहण्याची वेळ आली आहे. ठाकरे हे कार्यालयात उपस्थित नसल्याने अनेक अडचणी येत असल्याच्य तक्रारीही वाढल्या आहेत. त्यामुळे या अधिकार्‍यांनी आपापसांतील मतभेद मिटवावेत; अन्यथा दोघांची तातडीने बदली करावी, अशी मागणी आता अनेक संघटनांनी शासनाकडे केली आहे.

मर्जीतले ठेकेदार सांभाळण्यासाठी आले वितुष्ट

सध्या सार्वजनिक बांधकात विभागाकडे विशेष दुरुस्ती आणि रस्ते दुरुस्तीसाठी मोठा निधी आला आहे. मात्र अधीक्षक अभियंता संजय माळी आणि कार्यकारी अभियंता मनोज ठाकरे यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे. याचा विपरीत परिणाम सोलापूर जिल्ह्याच्या विकासावर होत आहे. ठाकरे यांनी सुचवलेल्या कामांवर माळी संशय घेतात आणि माळी यांनी सांगितलेली कामे ठाकरे ऐकत नाहीत. त्यामुळे दोघांमध्ये दरी निर्माण झाली आहे. मर्जीतले ठेकेदार सांभाळण्यासाठीच वाद असल्याची कुजबुज होत आहे.

इमारतीच्या दुरुस्त्या आणि रस्त्यांवरील खड्ड्यांकडे दुर्लक्ष

जिल्ह्यात असणार्‍या विविध शासकीय इमारती आणि जिल्ह्यातील रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजविण्यासाठी सध्या शासनाकडून कोट्यवधी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. मात्र या दोन्ही अधिकार्‍यांमधील समन्वयाच्या अभावामुळे ही कामे वेळेत होऊ शकत नाहीत. याचा विपरीत परिणाम जिल्ह्याच्या विकासावर होत आहे. इमारती आणि रस्ते नादुरुस्तीमुळे अनेकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. जिल्ह्यातील अनेक बांधकामे तसेच रस्त्यांची कामे प्रलंबितच आहेत.

Back to top button