सोलापूर विभागाच्या ताफ्यात लवकरच १०० नव्या बसेस | पुढारी

सोलापूर विभागाच्या ताफ्यात लवकरच १०० नव्या बसेस

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा :  राज्य एस. टी. महामंडळाला एस.टी. संप व लॉकडाऊनमुळे प्रचंड आर्थिक तोटा सहन करावा लागला. हा तोटा भरून काढण्यासाठी विद्युत व डिझेलवर धावणाऱ्या असे एकूण तीन हजार २०० बस राज्य एस.टी. महामंडळाच्या ताफ्यात दाखल करण्याचा निर्णय एस.टी. महामंडळाने घेतला आहे.

दोन हजार बस खरेदी प्रक्रियेला महामंडळाने सुरुवात केली आहे. सोलापूर विभागाकडून १०० साध्या बसगाड्यासाठी प्रस्थाव देण्यात आला आहे. जून २०२३ अखेर या बसगाड्या महामंडळाच्या ताफ्यात दाखल होणार असल्याची माहिती एसटीच्या अधिकाऱ्यांनी दिली.

राज्य एसटी महामंडळाच्या ताफ्यातील गाड्यांची संख्या कमी झाली आहे. ज्या गाड्या आहेत त्याही वाईट परिस्थितीत आहेत. कर्मचाऱ्यांची संख्या अधिक आणि गाड्या कमी अशी अवस्था महामंडळाची झाली होती, त्यामुळे राज्य एस. टी. महामंडळाचा हा निर्णय महत्त्वाचा जात आहे. मानला पर्यावरणपूरक बी-६ प्रकारातील इंजिन असलेली ११ मीटर लांबीची ही बस आहे. या प्रवाशांना आरामदायी प्रवास करता यावा, यासाठी नव्याने बांधण्यात येणाऱ्या साध्या गाड्यांमध्ये पुशबॅक बकेट आसने बसवण्याचा निर्णय एस. टी. महामंडळाने घेतला आहे. ही सुविधा प्रवाशांना साध्या दरात उपलब्ध होणार आहे.

एसटी महामंडळाच्या स्वमालकीच्या साध्या बांधणी ७०० बसगाड्यांची सुरू आहे. हे काम दापोडी (पुणे), चिकलठाणा (औरंगाबाद), हिंगणा (नागपूर) या मध्यवर्ती कार्यशाळांत सुरू आहे. तर भाडेतत्त्वावरील पहिल्या टप्प्यात ५०० साध्या बस लातूर, कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड, सांगली, पुणे या विभागांसाठी दाखल होणार आहेत. तर दुसऱ्या टप्प्यात सोलापूर विभागासाठी १०० साध्या बस मिळणार आहे. या बसची बांधणी पूर्ण झाल्यावर टप्प्याटप्प्याने गाड्या प्रवासी सेवेत दाखल होतील. दोन हजार बससाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली असून या बस खरेदीसाठी ७०० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. हा निधी राज्य सरकारकडून देण्यात येणार आहे.

Back to top button