शिंदे गटाला संपविण्याचा भाजपचा कट : सुषमा अंधारे

सांगोला; पुढारी वृत्तसेवा : देशातील व राज्यातील भाजप सरकारने डोईजड होणाऱ्या नेत्यांना व सहकारी पक्षांना संपविण्याचा डाव रचला आहे. आता शिंदे गटाला संपविण्याचे कटकारस्थान भाजपकडून सुरू आहे. शिंदे गटातील काही आमदार फुटले, तर भाजपमध्ये जाणारे पहिले आमदार शहाजीबापू पाटील असतील, असा घणाघाती आरोप उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला. सांगोला येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या ‘महाप्रबोधन’ यात्रेप्रसंगी उपनेत्या सुषमा अंधारे बोलत होत्या.
अंधारे म्हणाल्या की, अनेक वर्षांपूर्वीचे व्हिडीओ काटछाट करून माझ्यावर आरोप केले जात आहेत. या आरोपावरुन त्यांनी नकली भोंदूबुवांवर निशाणा साधला. ३३ मतदारसंघांत माझ्या सभा झाल्याने भाजप बेचैन झाला आहे. मला गुन्ह्यात अडकवण्यासाठी प्रयत्न करीत आहे. त्या म्हणाल्या की, आतापर्यंत भाजपचे पंकजा मुंडे, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील यांना संपविण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी व्यूहरचना आखली. आतापर्यंत जे पक्ष भाजपसोबत होते ते स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी व सदाभाऊ खोत यांना वेगळे केले. सदाभाऊ खोत आता सध्या कुठे आहेत, हे कोणीही ठामपणे सांगत नाही.
माझ्या भाषणाचा व्हिडिओ नेत्यांना व्यवस्थित दाखवावा
सुषमा अंधारे यांच्या सभेला शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या • प्रमाणात हजेरी लावली होती. यावेळी आमदार शहाजीबापू पाटील यांच्यावर होणाऱ्या टीकाटिप्पणीच्या वेळी शेकापच्या कार्यकर्त्यांनी शिट्ट्या व टाळ्या वाजविल्या. आ. शहाजीबापू पाटील यांच्या हाफ बिर्याणी व नाईंटीवाल्या खबऱ्यांनी माझ्या भाषणाचा व्हिडिओ नेत्यांना व्यवस्थित दाखवावा, असे सुषमा अंधारे बोलल्यानंतर सभेमध्ये हास्यकल्लोळ माजला.