सोलापूर : कार्यालयास लागली लाचखोरीची वाळवी; राज्यात 10 महिन्यात 934 लाचखोर गजाआड

File Photo
File Photo
Published on
Updated on

सोलापूर; अमोल व्यवहारे :  राज्यातील शासकीय कार्यालयात लाचखोरी वाढत आहे. राज्यात 1 जानेवारीपासून आतापर्यंत 934 इतक्या लाचखोरांना गजाआड करण्यात आले आहे. त्यात पुणे विभागातील 194 जणांचा समावेश आहे. लाचखोरीची बुरशी मुळापासून उखडून फेकण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून अनेक आश्वासक पाऊले उचलली जात आहेत. त्यापैकीच एक उपक्रम म्हणजे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून राबवण्यात येणारा जनजागृती सप्ताह होय.

यंदा राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने 31 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबर या कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. अनैतिकता आणि लाचखोरी हे माणसाच्या मानवीय व्यक्तिमत्त्वाला हीन बनवतात. त्यामुळे लाचखोरीतून मिळणारी श्रीमंती जास्त काळ समाजात प्रतिष्ठा टिकवू शकत नाही. त्या उलट प्रामाणिकपणाने मिळवलेली प्रतिष्ठा व संपत्ती यास समाजात अघोषित सन्मानपूर्वक दर्जा प्राप्त होतो. त्यामुळे लाचखोरी हे समाजाने नाकारलेला आणि गलिच्छ मानलेला कमाईचा मार्ग आहे. मात्र काही लाचखोर बाबू मंडळी झटपट श्रीमंती मिळवण्यासाठी लाचखोरीचा मार्ग निवडतात.

सोलापूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे जिल्ह्यातील राज्य सरकारचे विभाग, सहकारी संस्था व स्वायत्त संस्था तसेच सर्वसामान्य नागरिक यांच्यात यासंदर्भात जनजागृती करण्यात आली. दरम्यान, या विभागाने मिळविलेल्या विश्वासार्हतेचा परिणाम म्हणून एसीबीकडे येणार्‍या तक्रारींचा ओघ दिवसेंदिवस वाढत आहे. परंतु विश्वासार्हता कायम टिकावी यासाठी लाचखोरांना केवळ सापळ्यांमध्ये अडकवून उपयोग नाही. तर आरोपी निर्दोष सुटणार नाहीत याचीही काळजी घेणे क्रमप्राप्त आहे. आरोपींना शिक्षा हे ध्येय साध्य करण्यात अनेक अडथळे आहेत. मात्र त्यावर मात करीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आगेकूच केल्याने लाचखोरांना शिक्षा होण्याचा आलेख उंचावत चालला आहे.

पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 6 नोव्हेंबर 2022 पर्यंत एकूण 137 गुन्हे दाखल करून 194 लाचखोरांना गजाआड केले आहे. यामध्ये अपसंपदेच्या दोन गुन्ह्यांचाही समावेश आहे. संपूर्ण राज्यात 646 लाचखोरीचे एकूण गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. राज्यात 1 जानेवारीपासून आतापर्यंत 934 इतक्या लाचखोरांना गजाआड करण्यात आले आहे.

मागील वर्षी म्हणजेच 2021 साली राज्यभरातील लाचखोरीच्या गुन्ह्यांचा आकडा 773 इतका होता. प्रत्येक जिल्हा स्तरावर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यान्वित आहे. परंतु प्रत्येक दूरध्वनी क्रमांक वेगवेगळा आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना लाचलुचपत विभागाशी संपर्क करणे अवघड जाते. शिवाय ग्रामीण भागातील लोक या कार्यालयापर्यंत पोहोचू शकत नाहीत. या अडचणींचा विचार करून राज्यातील सर्व प्रतिबंधक विभागाने लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात 1064 हा टोल फ्री क्रमांक कार्यान्वित करण्यात आला आहे. तसेच लाचखोरी कमी व्हावी म्हणून या विभागाने कारवाईचे हत्यार उपसण्याबरोबरच जनजागृती मोहीम देखील हाती घेतली आहे.
त्यानुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत दरवर्षी जनजागृती सप्ताह राबवण्यात येत असून त्या अंतर्गत जनसामान्यांमध्ये भ्रष्टाचाराबाबत जागृती व्हावी यासाठी शासकीय कार्यालय व इतर ठिकाणी होडिंग, बॅनर्स, पोस्टर, स्टीकर आदीच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येते.

सोलापुरात 25 लाचखोर

सोलापूर जिल्ह्यात मागील वर्षी आतापर्यंत लाचखोरांची संख्या 19 एवढी होती. यंदा त्यामध्ये सहा जणांची वाढ झाली आहे. सोलापूर जिल्ह्यात आतापर्यंत 25 अधिकारी/कर्मचारी लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले आहेत.

राज्यात दाखल गुन्ह्यांची तसेच अटक आरोपींची आकडेवारी

मुंबई – 42 गुन्हे 59 आरोपी ठाणे – 74 गुन्हे 109 आरोपी
पुणे- 137 गुन्हे 194 आरोपी नाशिक – 110 गुन्हे 163
नागपूर – 68 गुन्हे 93 आरोपी अमरावती – 56 गुन्हे 101 आरोपी
औरंगाबाद – 101 136 आरोपी नांदेड – 58 गुन्हे 79 आरोपी

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news