भीमा कारखाना लढतीत महाडिकांची एकतर्फी बाजी | पुढारी

भीमा कारखाना लढतीत महाडिकांची एकतर्फी बाजी

सोलापूर/टाकळी सिकंदर, पुढारी वृत्तसेवा : मोहोळ तालुक्यातील टाकळी सिकंदर येथील भीमा सहकारी साखर कारखाना निवडणुकीत खा. धनंजय महाडिक आणि त्यांचे चिरंजीव विश्वराज यांच्या भीमा परिवार पॅनेलने दणदणीत विजय मिळवला. या पॅनेलने सर्व 15 जागा तब्बल 6 हजार 600 मताधिक्याने जिंकल्या. या निवडणुकीत माजी आ. राजन पाटील आणि प्रशांत परिचारक यांच्या भीमा बचाव पॅनेलचा धुव्वा उडाला. सलग तिसर्‍यांदा भीमा कारखान्यावर दणदणीत सत्ता मिळवत महाडिक यांनी हॅट्ट्रिक साधली.

भीमा कारखान्याच्या निवडणुकीसाठी सोमवारी (दि. 14) सकाळी सोलापुरात मतमोजणीस सुरुवात झाली. पहिल्या फेरीत एकूण 17 गावांतील मतमोजणी करण्यात आली. त्यामध्ये पहिल्या फेरीत 28 केंद्रांवरील सात हजार 500 मतांंच्या मोजणीअखेर भाजपचे खा. धनंजय महाडिक यांच्या भीमा शेतकरी विकास पॅनेलला निर्णायक आघाडी मिळाली. त्यामुळे मोहोळ, पंढरपूर तालुक्यांतील सभासद, महाडिक समर्थकांनी जल्लोष केला.पहिल्या फेरीअखेर महाडीक गटाने 3,700 चे मताधिक्य घेतले. दुसर्‍या फेरीअखेर 2,900 चे मताधिक्य होते.
कारखान्याच्या या निवडणुकीत 19 हजार 430 पैकी 15 हजार 323 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

संस्था मतदारसंघातून महाडिकांचा दणदणीत विजय

संस्था मतदारसंघातून 43 पैकी 31 मते प्राप्त करून खा. धनंजय महाडिक यांनी दणदणीत विजय प्राप्त केला. विरोधी पॅनेलचे देवानंद गुंड यांना फक्त 12 मतांवर समाधान मानावे लागले.

विजय सभासद, शेतकर्‍यांना समर्पित : महाडिक

मी हा विजय भीमा कारखान्याचे सर्व सभासद, शेतकरी यांना समर्पित करतो, असे सांगून खा. महाडिक म्हणाले, खरे पाहता या निवडणुकीमध्ये विरोधकांकडे कोणतेही मुद्दे नव्हते. आम्ही मात्र या निवडणुकीमध्ये विकासाची द़ृष्टी घेऊन लोकांना सामोरे गेलो. गेल्या दहा वर्षांमधील सर्व हिशेब, आश्वासने आम्ही पूर्ण केलेली आहेत. त्यामुळेच या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात शेतकरी, सभासद आमच्या बाजूने आले. उसाला चांगला दर, योग्य वजन काटा, या दोन महत्त्वाच्या गोष्टी घेऊन आम्ही लोकांच्या समोर गेलो. भविष्यात आम्ही भीमा कारखान्यावर इथेनॉल प्रकल्प उभारू, अशी ग्वाही आम्ही लोकांना दिल्याने त्यांनी आम्हाला खूप मोठ्या प्रमाणात साथ दिली. त्याचबरोबर मी खासदार असल्यामुळे मोहोळ तालुक्यातील विकासकामांकडे लक्ष देऊन ती कामे पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्नशील राहीन. 15 हजारांपैकी विरोधकांना फक्त तीनच हजार मते मिळाली आहेत. याबद्दल मी सर्व सभासद, ऊस उत्पादकांचे जाहीर आभार मानतो.

Back to top button