‘टेक्स्टाईल’ अभ्यासक्रम बंद; शासकीय तंत्रनिकेतनमधील प्रकारामुळे जिल्ह्यातील वस्त्रोद्योग उद्योगाला बसतोय फटका | पुढारी

'टेक्स्टाईल' अभ्यासक्रम बंद; शासकीय तंत्रनिकेतनमधील प्रकारामुळे जिल्ह्यातील वस्त्रोद्योग उद्योगाला बसतोय फटका

सोलापूर; अंबादास पोळ : शासकीय तंत्रनिकेतन संबंधी अनेक तक्रारी समोर येत आहेत. या संस्थेत विविध प्रकारचे सात कोर्स शिकवले जात होते. परंतु, एआयसीटी या केंद्र सरकारच्या तंत्र शिक्षण संस्थेने टेक्स्टाईल मॅन्युफॅक्चरिंग या पदविका अभ्यासक्रमसाठी विद्यार्थ्यांची संख्या कमी असल्याचा निष्कर्ष काढून पदविका अभ्यासक्रम रद्द करण्यात आला. हा अभ्यासक्रम बंद करून स्थानिक यंत्रमाग उद्योग आणखी अडचणीत येण्याची शक्यता स्थानिक यंत्रमाग उद्योजकांकडून व्यक्त केली जात आहे.

सोलापूर शहर चादर, टॉवेल यासाठी प्रचलित आहे. हे शहरात टेक्स्टाईल हब म्हणून ही ओळखले जाते. यासाठी राज्य शासनाने महाराष्ट्रात दोन ठिकाणी शासकीय तंत्रनिकेतनमध्ये टेक्स्टाईल मॅन्युफॅक्चरिंग पदविका अभ्यासक्रम सुरू केला होता. यामध्ये नागपूर आणि सोलापूरचा समावेश होता. येथील युवकांना कौशल्यावर रोजगार उपलब्ध होईल, या दृष्टीने राज्यातील ३६ जिल्ह्यांपैकी प्रामुख्याने सोलापूर येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये १९७६ साली वस्त्र निर्माण विभाग सुरू करण्यात आला होता. शासकीय तंत्रनिकेतनमध्ये अन्य सहा प्रकारांच्या कोर्सला विद्यार्थ्यांची मोठी मागणी असते मोलाच्या विकासाच्या दृष्टीने सुरू करण्यात आलेल्या टेक्स्टाईल मॅन्युफॅक्चरिंग पदविका अभ्यासक्रमामध्ये टेक्स्टाईल विषयावर एकापेक्षा अधिक अभ्यासक्रम सुरू करणे गरजेचे असताना सुरू असलेला वस्त्र निर्माण विभागातील टेक्स्टाईल मॅन्युफॅक्चरिंग हा पदविका अभ्यासक्रम विद्यार्थ्यांची अपेक्षित संख्या नसल्याने बंद केला आहे. यासाठी प्रवेश संख्या २० असून २०२०-२१ मध्ये फक्त ५ विद्याथ्यांनी प्रवेशासाठी अर्ज केले. यामुळे गेल्या अनेक वर्षापासून सोलापूर टेक्स्टाईल उद्योगाला मनुष्यबळ पुरवणारा करणारा हा एकमेव अभ्यासक्रम बंद करण्यात आला आहे.

यंत्रमाग उद्योजकांनी पुढाकार घ्यावा…

राज्यातील इतर खासगी संस्थांकडून हाच पदविका अभ्यासक्रम लाखो रुपये घेऊन चालवला जातो. पदविका अभ्यासक्रमासोबत फॅशन डिझायनिंग आणि टेक्स्टाईल प्रोसेसिंग हे अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. पदविका घेतलेले काही विद्यार्थी त्या ठिकाणी जाऊन अध्यापन करतात. दुसरीकडे एआयसीटी या केंद्र सरकारच्या तंत्र शिक्षण संस्थेने पदवी अभ्यासक्रमासाठी पटसंख्या मिळत नसल्याच्या कारणावरून हा अभ्यासक्रम रद्द केला. सोलापुरातील टेक्स्टाईल हबसाठी पूरक अभ्यासक्रमच शिल्लक राहिला नाही. शहरातील टेक्सटाइल उद्योग टॉवेल, चादरी उत्पादनातून सर्वाधिक निर्यात मिळवून देणारा आहे. त्यामुळे सोलापूरची प्रगती लक्षात घेऊन विकासाच्या दृष्टीने या कोर्ससोबत गारमेंटचा कोर्स पुन्हा सुरू करण्याची आवश्यकता आहे. यासाठी स्थानिक यंत्रमाग उद्योजकांच्या पुढाकाराची गरज आहे.

Back to top button