खोकी घेतली नाहीत तर तो शब्द का झोंबतो? : आदित्य ठाकरे | पुढारी

खोकी घेतली नाहीत तर तो शब्द का झोंबतो? : आदित्य ठाकरे

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : राज्यातील मोठे उद्योग दुसर्‍या राज्यात जात आहेत. अतिवृष्टीमुळे ओला दुष्काळ राज्यात निर्माण झालेला आहे. शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. युवा वर्ग नोकरीच्या शोधात असताना राज्य शासन या विषयांकडे दुर्लक्ष करून केवळ घाणेरड राजकारण करत आहे. राज्यातील सध्याचे सरकार खोके सरकार आणि ईडी सरकार म्हणून नावारुपाला आलेले आहे. जर खोकी घेतलेली नसतील तर त्यांना हा शब्द का झोंबतो, असा सवाल युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी केला.

आदित्य ठाकरे आज ( दि. ९ ) सोलापूर दौर्‍यावर आले होते. यावेळी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले की, राज्यात शेतीच्या नुकसानीची पाहणी शिवसेनेच्या वतीने करण्यात येत आहे. शेतकरी आडचणीत असताना राज्याचे कृषी मंत्री गायब आहेत. शिवसेनेने शेतकर्‍यांच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरण्याची तयारी ठेवलेली आहे. शेतकर्‍यांना तातडीने आर्थिक मदत करण्यासाठी राज्य शासनाने पावले उचलावीत. खोके सरकार हा शब्द प्रयोग आता राज्यभर फेमस झालेला आहे. त्यामुळे सरकार कोण कोणाला नोटीस देणार; राज्यातील सध्याचे सरकार खोके सरकार आणि ईडी सरकार म्हणून नावारुपाला आलेले आहे.  खोकी घेतलेली नसतील तर त्यांना हा शब्द झोंबतो का, असा सवाल त्यांनी केला. आम्हाला नोटीसा देण्यापूर्वी गद्दारांनी या शब्दाचा त्रास का होतो, हे स्पष्ट करावे, असे आवाहन त्यांनी दिले.

यावेळी विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, संपर्क प्रमुख अनिल कोकळी, युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई, राज्य विस्तारक शरद कोळी, जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम बरडे, संभाजी शिंदे, गणेश वानकर, प्रताप चव्हाण, माजी मंत्री उत्‍तम प्रकाश खंदारे आदी उपस्थित होते.

राज्यातील कृषी आणि उद्योगमंत्री गायब

राज्यात सध्या ओला दुष्काळ निर्माण झाला आहे त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे तर दुसरीकडे अनेक उद्योग दुसर्‍या राज्यात निघून गेले आहेत. त्यावर ही सरकार काहीच बोलायला तयार नाही. पोलिस भरती पुढे ढकलली तरी सरकार झोपेत आहे.अशा परिस्थिती हे दोन्ही मंत्री कोठेच दिसून येत नाहीत, असेही आदित्य ठाकरे म्‍हणाले.

युवकांमध्ये प्रचंड उत्साह आणि गर्दी गोंधळ

युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे येथील एका हॉटलेवर थांबले होते. यावेळी त्यांना भेटण्यासाठी शहर व जिल्ह्यातील युवकांनी तसेच शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे काही काळ गोंधळ निर्माण झाला होता.

Back to top button