कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या गाड्यांचा ताफा घुसला वारकर्‍यांच्या गर्दीत | पुढारी

कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या गाड्यांचा ताफा घुसला वारकर्‍यांच्या गर्दीत

पंढरपूर, पुढारी वृत्तसेवा : कार्तिकी एकादशीनिमित्त विठ्ठल मंदिर परिसरात लाखो वारकर्‍यांची गर्दी उसळलेली असताना या गर्दीत राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार आणि त्यांच्यासोबत अधिकारी, काही पदाधिकारी यांच्या गाड्यांचा ताफा घुसला. थेट विठ्ठल मंदिरास वळसा घालून हा ताफा आल्याने भाविकांनी तीव्र संताप व्यक्त केला.

कार्तिकी एकादशीनिमित्त मंदिर परिसरात लाखो वारकर्‍यांची गर्दी होती. दुपारची 1 वाजताची वेळ होती. अगदी पाय ठेवायला ही जागा शिल्लक नव्हती. उन्हाचा चटका असल्याने भाविकांची घालमेल सुरू असतानाच लाल दिव्याच्या गाडीसह त्यांच्या मागे 4 ते 5 गाड्यांचा ताफा गर्दीत घुसला. चौफाळा येथून थेट विठ्ठल मंदिराच्या उत्तर द्वारात मंत्री महोदय आणि त्यांचा ताफा शिरला.

नामदेव पायरी पासून पुन्हा मंदिरास वळसा घालून गर्दी हटवत हा ताफा संत तुकाराम भवन येथे आला. त्याठिकाणी मंत्री महोदयांचा कार्यक्रम होता. मंत्री कार्यक्रमास गेल्यानंतरही बराचवेळ ही वाहने तुकाराम भवनजवळ उभा होती. पोलिसांनी सोबत आलेली वाहने गर्दीतून बाहेर काढली. मात्र, मंत्र्यांची लाल दिव्याची गाडी कशी हलवायची, याचा प्रश्न पोलिसांना पडला होता.

बाहेर गर्दी वाढल्याने भाविक संतप्त झाले होते. शेवटी एक पोलीस कर्मचारी थेट मंचावर आला आणि कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांना आपली गाडी गर्दीला अडथळा होत असल्याचे सांगितले. त्यांनी गाडी बाहेर काढण्याची सूचना केल्यानंतर तुकाराम भावनासमोरून मंत्र्यांची गाडी पोलिसांनी गर्दीतून बाहेर नेली. कार्यक्रम संपल्यानंतर मंत्री सत्तार चालत गाडी पर्यंत गेले.

दरम्यान, पत्रकारांनी गर्दीच्या काळात वाहनांचा ताफा मंदिर परिसरात आणल्याबद्दल विचारले असता या गर्दीबाबत आणि मंदिर परिसरात वाहने आणायची नाहीत याची मला कल्पना नव्हती, माझी पायी चालत यायची तयारी होती. मी अगदी आताही 10 किमी पर्यंत चालत जाऊ शकतो. असे कृषिमंत्री सत्तार यांनी उत्तर दिले.

Back to top button