

पंढरपूर, पुढारी वृत्तसेवा : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व डॉ. प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी यांच्यात आघाडी जेव्हा होईल तेव्हा बघू. आम्हाला विरोध करणारे, एकमेकाला पाण्यात पाहणारे आहेत. ज्यांचे विचार कधीच एकमेकांशी पटले नाहीत, असे लोक एकत्रित येत आहेत, असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना लगावला.
वर्षभरातील चार महत्त्वाच्या यात्रा आणि श्री विठ्ठल-रुक्मिणी दर्शनाकरिता येणार्या भाविकांची संख्या लक्षात पंढरपूर येथील भाविकांना सोयीस्कर ठरेल असाच आराखडा राबवणार असल्याचे स्पष्ट करून फडणवीस म्हणाले, भाविकांना जास्तीत जास्त सेवासुविधा कशा देता येतील, कमीत कमी वेळ भाविकांना दर्शन रांगेत थांबावे लागेल, याचा विचार विकास आराखड्यात केला आहे.
कोरोनानंतर निर्बंधमुक्त कार्तिकी यात्रा भरत आहे. याचा आनंद होत आहे. त्यामुळे विठ्ठलाकडे मागणे आहे की, महाराष्ट्र सुजलाम्-सुफलाम् व्हावा. विठ्ठल आमच्या पाठीशी आहे. म्हणूनच संकटे दूर होत असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आ. समाधान आवताडे, माजी आ. प्रशांत परिचारक आदी उपस्थित होते.