शिक्षणाधिकारी किरण लोहारला लाच घेताना रंगेहाथ पकडले!

शिक्षणाधिकारी किरण लोहारला लाच घेताना रंगेहाथ पकडले!

Published on

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा :  प्राथमिक शाळेच्या मान्यतेसाठी 50 हजार रुपयांची मागणी करीत कार्यालयातच 25 हजार रुपयांची लाच घेणारा सोलापूर जिल्हा परिषदेचा शिक्षणाधिकारी किरण लोहार याला लाचलुचपत (एसीबी) विभागाने सोमवारी सायंकाळी रंगेहाथ पकडले. लोहारला अटक करण्यात आल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली.

शिक्षणाधिकारी लोहार याला 'एसीबी'ने गजाआड केले असून, त्याच्या कार्यालयातील कनिष्ठ सहायक अल्ताफ पटेल या लिपिकाला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणातील तक्रारदाराची उत्तर सोलापूर तालुक्यातील कोंडी येथे स्वयंअर्थसहाय्यित प्राथमिक शाळा आहे.

पाचवी ते आठवीचे वर्ग वाढण्यासाठी शाळेने वर्गवाढीच्या परवानगीची मागणी प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार याच्याकडे केली होती. त्याचा आयडी देण्यासाठी शिक्षणाधिकारी लोहार याने 50 हजार रुपयांची लाच मागितली. दरम्यान, तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. तक्रारीची शहानिशा करून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी सायंकाळी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातच सापळा रचला होता. सायंकाळी सहाच्या सुमारास शिक्षणाधिकारी लोहार याने तक्रारदाराकडून लाचेची 25 हजार रुपयांची रक्कम घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लोहारला रंगेहाथ अटक केली.

काल पुरस्कार अन् आज बेड्या

शिक्षणाधिकारी किरण लोहार याला रविवारी (दि. 30) भिलार येथे झालेल्या एका संघटनेच्या राज्यस्तरीय अधिवेशनात उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात आला होता. त्याच्या दुसर्‍याच दिवशी लोहार याला लाच घेताना रंगेहाथ पकडले. त्यामुळे पुरस्कार मिळालेल्या अधिकार्‍याच्या हातात दुसर्‍याच दिवशी बेड्या पडल्याबाबत जिल्हा परिषदेच्या आवारात चर्चा होती.

डिसले गुरुजींनाही केले होते हैराण

किरण लोहार याने सोलापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचा पदभार घेऊन साधारणत: 13 महिने झालेत. या काळात त्याने जिल्ह्यातील शिक्षण विभागात चौकशीची एकच खळबळ माजवून दिली होती. आंतरराष्ट्रीय पुरस्कारप्राप्त ग्लोबल टीचर रणजित डिसले यांना दिलेला त्रास, शिक्षक संघटनांची तसेच पदाधिकार्‍यांवर केलेली जाणीवपूर्वक कारवाई, यामुळे जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्र ढवळून निघाले होते; पण लाचलुचपतच्या जाळ्यात अडकल्यानंतर लोहार याच्या विविध कारनाम्यांची माहिती पुढे येत आहे. कार्यालयातील कोणत्याही कामाची फाईल वजन ठेवल्याशिवाय पुढे सरकत नसल्यानेच त्याच्या या कृत्याची पोलखोल झाली.

कोल्हापुरातही होणार लोहारची झाडाझडती; पीएच.डी.ही बोगस

जि.प. प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. किरण लोहार हा मूळचा कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील येळाणे गावचा रहिवासी आहे. कोल्हापुरात सेवेत असतानाही लोहार हा वादग्रस्त राहिला आहे. लोहार याला 'कॉमनवेल्थ व्होकेशनल युनिव्हर्सिटी ऑफ टोंगा' या विद्यापीठाकडून पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली होती. पीएच.डी. देणारी ही संस्थाच बोगस असल्याचे शिक्षण संचालकांच्या चौकशीत उघड झाल्याने त्यांच्या तक्रारीवरून पुण्यातील वानवडी पोलिस ठाण्यात लोहार याच्यावर 2019 मध्ये गुन्हाही दाखल आहे. सोलापुरात लोहार याच्यावर कारवाई झाल्यानंतर त्याच्या मूळ गावातील घराची झडती व संपत्तीची चौकशी लाचलुचपत पथकाकडून करण्यात येत आहे.

प्रामाणिकपणाचा तोरा गळून पडला

जि.प. प्राथमिक शिक्षणाधिकारीपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून गेल्या वर्षभरात किरण लोहार हा अनेकदा कडक शिस्तीचा व चोख प्रामाणिकपणाचा तोरा दाखविताना दिसून येत होता. अचानक शाळांना भेटी देणे, शिक्षकांना नोटीस देऊन त्यांना कार्यालयात यावयास लावणे, दंड आकारणे अशा कारणांनी तो चांगलाच चर्चेत आला होता. डिसले गुरुजींच्या प्रकरणात तर तो राज्यात गाजत होता; पण लाचलुचपत विभागाने केलेल्या कारवाईमुळे त्याच्या प्रामाणिकपणाचा तोरा गळून पडला असून, भ्रष्ट चेहरा समोर आला. यामुळे डॉ. किरण लोहार याची प्रतिमा जनमानसात मलीन झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news