सोलापूर : धावत्या सिद्धेश्वर एक्स्प्रेसला आग, प्रवासी थोडक्यात बचावले | पुढारी

सोलापूर : धावत्या सिद्धेश्वर एक्स्प्रेसला आग, प्रवासी थोडक्यात बचावले

सोलापूर ; पुढारी वृत्तसेवा : सोलापूरहून मुंबईच्या दिशेने निघालेल्या सिद्धेश्वर एक्स्प्रेस या गाडीच्या चाकांमधील घर्षणामुळे आग लागल्याची घटना घडली. ही घटना आज (शुक्रवार) पहाटे पाच वाजून 40 मिनिटाला खंडाळा ते कर्जत रेल्वे स्थानका दरम्यान घडली. मात्र, गाडीतील कर्तव्यावर असलेल्या टीसी व आरपीएफ जवानाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला.

या विषयी मिळालेल्‍या अधिक माहितीनुसार, गाडी क्रमांक 12116 सिद्धेश्वर एक्स्प्रेस आज दि. 7 ऑक्टोबर शुक्रवार रोजी सोलापूरहून मुंबईच्या दिशेने निघालेल्या गाडीच्या चाकामध्ये प्रचंड घर्षण होऊन आग निर्माण झाली. ही घटना खंडाळा ते कर्जत रेल्वे स्थानकादरम्यान धावत्या गाडीच्या S2 व S3 कोच मध्ये घडली. दोन डब्यांना जोडल्या गेलेल्या गॅप मधून अचानक धुराचे लोट डब्यामध्ये पसरताच गाडीला आग लागली. या घटनेनंतर प्रवाशांमध्ये एकच धावपळ सुरू झाली.

गाडीमध्ये आग लागल्याची माहिती आरपीएफ जवान व टीसी याांना मिळताच सिद्धेश्वर एक्स्प्रेस कर्जत रेल्वे स्थानकावर थांबवण्यात आली. लागलीच S2 व S3 मधील सर्व प्रवाशांना आग आटोक्यात येईपर्यंत इतर डब्यात हलवण्यात आले. गाडीतील आरपीएफ जवान व टीसी यांनी तत्काळ अग्निरोधक यंत्राचा वापर सुरू केला. जवळपास सात ते आठ कार्बन डाय-ऑक्साइड सिलिंडरचा वापर करून आगीवर नियंत्रण मिळवले. आग विझवण्यासाठी 25 ते 30 मिनिटे गाडी कर्जत स्थानकावर थांबवण्यात आली. घटनेची माहिती पुणे विभागातील कंट्रोल रूमला मिळताच वरिष्ठ अधिकारी व यंत्रणा घटनास्थळी दाखल झाले. गाडीची पाहणी करून गााडी पुन्हा मुंबईच्या दिशेने रवाना करण्यात आली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

संबंधित बातम्या

धावत्या रेल्वेमध्ये अचानक धुराचे लोट आल्याने गाडीतील S1,S2 व‌ S3 डब्यातील प्रवाशांची धावपळ सुरू झाली. प्रवाशांचा आरडाओरडा सुरू झाल्याने टीसी व आरपीएफ जवान तत्काळ गाडी थांबवून आग विझवण्याचे काम केले. जवळपास 30 ते 40 मिनिट गाडी कर्जत रेल्वे स्थानकात दरम्यान थांबून होती.

यास्मिन अन्सारी ,प्रवासी

हेही वाचा :  

Back to top button