सोलापूर : कोरोनात घरी बसणारे दररोज सभा घेतात : चंद्रकांत पाटलांची विरोधकांवर टीका | पुढारी

सोलापूर : कोरोनात घरी बसणारे दररोज सभा घेतात : चंद्रकांत पाटलांची विरोधकांवर टीका

सांगोला; पुढारी वृत्तसेवा : पंढरपूर विधानसभा पोट निवडणुकीनंतर राज्यात सत्तातंराला सुरुवात झाली. अडीच वर्षे सत्तेत नसल्याने आघाडी सरकारने भाजपच्या कार्यकर्त्यांवर सूडबुद्धीने गुन्हे दाखल केले. प्रशासकीय बदल्या, गुन्हे दाखल होत असल्याने कार्यकर्ते दबावात होते. पालकमंत्री कामे करण्यासाठी सक्षम आहेत. दररोज अजित पवार, जयंत पाटील घोषणा करत आहेत. कोरोना काळात घरी बसणारे आज दररोज सभा, आक्रोश मेळावे घेत आहेत, अशी टीका उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. ते सांगोला येथे भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मेळाव्याप्रसंगी बोलत होते.

यावेळी खासदार रणजितसिंह निंबाळकर, जिल्हाध्यक्ष आ. सचिन कल्याणशेट्टी, आमदार सुभाष देशमुख, आमदार समाधान आवताडे, धैर्यशील मोहिते-पाटील, शशिकांत चव्हाण, भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत, जिल्हा परिषद सदस्य अतुल पवार, माजी सभापती संभाजी आलदर, शिवाजीराव गायकवाड, बंडू केदार, राजश्री नागणे, माजी पंचायत समिती सदस्य सीताराम सरगर, गजानन भाकरे, जगदीश बाबर, एन. वाय. भोसले, शीतल लादे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. ना. चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले, आगामी काळात सांगोला तालुक्यात भाजपचे संघटन मजबूत करण्यावर भर द्यावा. तसेच आगामी काळात सांगोला तालुक्यातील उमेदवार हा भाजप-सेना युतीचा असणार असून, त्यासाठी सर्वांनी आतापासूनच कामाला लागावे, असे आवाहन पाटील यांनी केले.

दरम्यान, खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी बैठकीत लोकसभा मतदारसंघातील जनतेचे प्रश्न, अडीअडचणी जाणून घेत बैठकीतूनच अधिकार्‍यांशी दूरध्वनीकरून संपर्क साधत गावांच्या समस्या तात्काळ सोडविण्याच्या सूचना दिल्या. तसेच लवकरच सांगोला तालुक्याची आढावा बैठक घेऊन प्रत्येक गावांचा गावभेट दौरा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी सांगोला भाजपचे पदाधिकार्‍यांसह परिसरातील अनेक भाजपचे कार्यकर्ते या मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा :

Back to top button