वाळूबाबत राज्य सरकार लवकरच नवे धोरण राबवणार : महसूल मंत्री

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : सध्या राज्यातील सर्वच जिल्ह्यात वाळू माफियांनी थैमान घातले आहे. यामुळे गुन्हेगारी ही वाढत चालली आहे. वाळू चोरीमुळे शासनाच्या महसुलावर ही पाणी फेरले जात आहे. त्यामुळे राज्यात सर्वच जिल्ह्यात होणारी वाळू चोरी रोखण्यासाठी लवकरच राज्य सरकार वाळूबाबत नवे धोरण राबविणार असल्याची माहिती राज्याचे महसूल मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे -पाटील यांनी दिली.
पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील हे पालकमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच मंगळवारी सोलापूर दौर्यावर आले होते. यावेळी पंढरपूर येथे त्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधीशी संवाद साधला. यावेळी राज्यातील वाळू धोरणाबाबत महसूल मंत्री या नात्याने त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. सोलापूर जिल्ह्यासह पंढरपूर तालुक्यातील अनेक भागात मोठ्या प्रमाणावर वाळू चोरी होत आहे. तसेच नदीपात्रात मोठ- मोठे खड्डे पडत असल्याने यात्रा काळात या खड्डयातील पाण्याचा अंदाज न आल्याने अनेक वारकर्यांचा मृत्यू झाल्याची माहिती महसूल मंत्र्यांना दिली. जर वाळू लिलाव नसताना जिल्ह्यातील अथवा राज्यातील कोणत्या ही भागात वाळू चोरी होत असेल तर त्यांच्यावर तात्काळ कारवाई करा. तसेच त्या ठिकाणी कार्यरत असणारे तलाठी, मंडळ अधिकारी आणि तहसीलदार यांच्यावर ही निलंबनाची कारवाई करा, अशा सूचना विखे -पाटील यांनी राज्यातील सर्वच जिल्हाधिकार्यांना दिल्या आहेत.
राज्य सरकार आता वाळूबाबत लवकरच नवे धोरण राबविणार आहे. त्यासाठी नाशिक विभागाचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करण्यात आली आहे. ही समिती देशातील इतर राज्यातील वाळू धोरणाचा अभ्यास करणार आहे. तसेच त्यांनी सुचना केल्याप्रमाणे वाळू लिलाव आणि विक्रीबाबत लवकरच नवे धोरण राबविणार असल्याची माहितीही विखे -पाटील यांनी दिली आहे.
तर त्या भागातील तलाठी, मंडल अधिकारी, तहसीलदार होणार निलंबित
राज्यातील अनेक जिल्ह्यात वाळू चोरी मोठ्या प्रमाणावर होत आहे. लिलाव बंद असतानाही राजरोसपणे वाळू चोरी करुन शासनाच्या कोट्यावधी रुपयांच्या महसुलावर वाळू तस्कर दरोडा टाकत आहेत. ही वाळू चोरी थांबविण्यासाठी ज्या भागातून वाळू चोरी केली जाते, त्या भागातील तलाठी, मंडळ अधिकारी, तहसीलदार आणि प्रांताधिकार्यांना तातडीने निलंबित करण्याच्या सूचना महसूल मंत्री राधाकृष्ण विखे -पाटील यांनी दिल्या आहेत. त्यामुळे अधिकारी आणि कर्मचार्यांचे आता धाबे दणाणले आहेत.
हेही वाचलंत का?