सोलापूर : मुलं पळविणारी समजून निर्दोष महिलेला नागरिकांनी पकडलं; कुलकर्णी तांड्यावर गोंधळ

सोलापूर : मुलं पळविणारी समजून निर्दोष महिलेला नागरिकांनी पकडलं; कुलकर्णी तांड्यावर गोंधळ
Published on
Updated on

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुलकर्णी तांडा येथे गुरुवारी सकाळी मुलं पळविणारी एक महिला आली आहे, अशी अफवा पसरली होती. तांड्यावरील सर्व ग्रामस्थ चवताळून तिच्या अंगावर धावून गेले. त्यामुळे कुलकर्णी तांड्यावर एकच गोंधळ उडाला होता. सुजाण ग्रामस्थांनी मध्यस्थी करत पोलिसांशी संपर्क केला आणि त्या महिलेला पोलिसांच्या ताब्यात दिले.

सर्व चौकशी करुन पोलिसांनी खरी माहिती समोर आणली, ती महिला ही रागाच्या भरात घरातून निघून चालली होती. पोलिसांनी तिला तिच्या वडिलांना बोलावून सुखरुप हवाली केले. सुदैवाने तिला कोणत्याही प्रकारची मारहाण करण्यात आली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.

सुदैवाने तिला कोणी मारहाण केली नाही

आफरोज हशमोद्दीन शेख (वय 34 रा, सैफुल, सोलापूर) ही राहत्या घरातून रागाच्या भरात बुरखा घालून घरातून निघून चालली होती. पायी जात असताना आफरोज शेख ही कुलकर्णी तांड्याकडे गेली. सोलापूर विजयपूर महामार्गावर असलेल्या कुलकर्णी तांड्यावर आफरोज शेखला बुरख्यात पाहताच सकाळी मोठा गोंधळ उडाला. मुलं पळविणारी महिला आपल्या परिसरात फिरत आहे, अशी अफवा वार्‍यासारखी तांड्यावर पसरली. काही तरुणांनी आणि इसमांनी तिला धक्काबुक्की देखील केली. पण, ग्रामपंचायत सदस्यांनी ताबडतोब मध्यस्थी करत मारहाण करणार्‍यांना रोखले आणि महिलेला पोलिसांच्या स्वाधीन केले.

आफरोज शेख ही रागाच्या भरात बुरखा घालून घराबाहेर पडली. कुलकर्णी तांड्यावरील ग्रामस्थांना बुरखा घालून जाणार्‍या महिलेवर अधिक संशय बळावला. ग्रामस्थांनी तिला पकडून जाब विचारु लागले. पण, ती बुरखा काढण्यास नकार देत होती. मुलं पळविण्यासाठी आली आहे, असे सांगत तांड्यावरील ग्रामस्थांनी बुरखा काढला आणि धक्काबुक्की केली.

महिलेनेच सोडविले ग्रामस्थांच्या तावडीतून

तांड्यावर राहणाऱ्या चांदूबाई चव्हाण यांनी आफरोजला ग्रामस्थांच्या तावडीतून सोडविले आणि विजापूर नाका पोलिसांना माहिती दिली. ड्युटीवर असणारे बिट मार्शल हे ताबडतोब कुलकर्णी तांड्यावर गेले आणि सदर तरुणीस ताब्यात घेतले. पोलीस ठाणे येथे आणून सविस्तर माहिती जाणून घेतली आणि मुलं पळविणारी महिले बाबत अफवा असल्याची माहिती दिली. आफरोज शेखचे वडील हशमोद्दीन शेख यांना बोलावून घेऊन तिला त्यांच्या ताब्यात दिले. सुदैवाने तिला मारहाण झाली नसल्याने तिच्या वडिलांनी सुटकेचा श्वास सोडला.

पोलीस आयुक्त आणि अधीक्षकांचे अफवा न पसरवण्याचे आवाहन

पोलीस आयुक्त डॉ. राजेंद्र माने आणि पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांनी काही दिवसांपूर्वी सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील जनतेला आवाहन केले आहे, की सोलापुरात मुलं पळविणारी अशी घटनेची कुठेही नोंद झालेली नाही. नागरिकांनी आणि ग्रामीण भागातील ग्रामस्थांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, तसे आढळल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क करा असं आवाहनही केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news