सोलापूर: नान्नज येथे रेणुका देवीच्या मंदिरात नवरात्र जागर सुरु | पुढारी

सोलापूर: नान्नज येथे रेणुका देवीच्या मंदिरात नवरात्र जागर सुरु

उत्तर सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : नान्नज (ता. उत्तर सोलापूर) येथील ग्रामदैवत माहूरची आई अशी ओळख असलेल्या रेणुकादेवीच्या नवरात्रौत्सवास मोठ्या उत्साहात आज (दि.२६) सुरूवात झाली. सुमारे २०० वर्षांपूर्वी नवरात्र काळात नान्नजमधून नांदेड जिल्ह्यातील माहूर गडावर बैलगाड्या जात होत्या. येताना सर्व बैलगाड्या नान्नज येथे विसाव्याकरिता थांबल्या होत्या. यावेळी थांबलेल्या एका बैलगाडीच्या बैलाच्या पायातील नखात अडकलेला खडा बाहेर पडला. त्याच वेळी तिथे उपस्थित असलेल्या भक्तांना माहूरच्या देवीने दर्शन दिले. तेव्हापासून माहूरच्या आईचे प्रति ठाणे म्हणून नान्नजची ओळख झाली, अशी आख्यायिका देवीची मानकरी आजही मोठ्या श्रद्धेने सांगतात.

जवळच काही अंतरावर मराठवाड्याची सीमा असून नान्नजसह वडगाव, बोबडेवाडी, नरोटेवाडी, मार्डी, बाणेगाव, वडाळा तसेच सोलापुरातील भाविकांची नवरात्र काळात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. सध्या माहूरची आई नवरात्र जागर सुरू असून पायामध्ये पादत्राणे न घालता पहाटेपासून भाविक मंदिराकडे देवदर्शनाला चालत जातात. पहाटेपासून मंदिर परिसरात चहा, दूध, फराळाच्या पदार्थांचे भाविक वाटप करतात. दसऱ्यादिवशी रात्री नंदाईदेवी मंदिरापासून गावात देवीच्या पालखीची मिरवणूक होते.
माहूरची आई देवीचे मानकरी तोडकर व कोरे आहेत. सध्या नवरात्र काळात देवीची पहाटे ५ वाजता, सकाळी ११ वाजता, तर रात्री ८ वाजता आरती, देवीला अभिषेक, असा धार्मिक विधी सुरू आहे. तर मंदिर परिसरात अनेक भाविक नवरात्रात उपवास करत मुक्कामी राहतात.

हेही वाचलंत का ? 

Back to top button