कोल्हापूर : श्री अंबाबाईची सिंहासनारूढ रुपातील पूजा | पुढारी

कोल्हापूर : श्री अंबाबाईची सिंहासनारूढ रुपातील पूजा

पुढारी ऑनलाईन डेस्क : अश्विन शु. प्रतिपदेपासून शु. नवमीपर्यंत (शारदीय नवरात्र) नऊ दिवस घटस्थापना, सप्तशती पाठ, होमहवन वगैरे प्रकारे माझे भक्तीयुक्त पूजन करावे. याप्रमाणे नवरात्रामध्ये देवी तत्त्व विशेष जागृत असते. प्रतिपदेपासून नवमीपर्यंत अखंड दीप प्रज्वलन, मालाबंधन, नक्तव्रत, एकभुक्त व्रत, अयाचित व्रत, विशिष्ट जप आदि कुळाचार पाळले जातात.

२६ सप्टेंबर १७९५ रोजी दसऱ्यादिवशी करवीरचे छत्रपती श्रीमंत संभाजीराजे यांच्या आज्ञेने राजश्री सिदोजी हिंदुराव घोरपडे यांच्या नेतृत्वाने श्री महालक्ष्मीच्या मूर्तीची पुनर्प्रतिष्ठापना केली होती. या गोष्टीस आज ३०७ वर्षे पूर्ण होत आहेत. हा एक शुभ योगायोग! करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अंबाबाई ही सर्वस्याद्या होय. नवरात्रातील प्रतिपदेस तिची सिंहासनारुढ रुपात पूजा बांधली जाते. सिंहासनामध्ये सिंहाचा मुखवटा, पाय यांच्या आकाराचा अंतर्भाव असतो. कारण सिंह हे शौर्य, सामर्थ्य, वैभव, ऐश्वर्य, सत्ता यांचे प्रतीक आहे. सिंहासनावर विराजमान होणारे देव व राजे हे सार्वभौमत्व दर्शवितात. श्री महालक्ष्मी ही विश्वाची सार्वभौम सत्ताधीश आहे, अशी श्रद्धा असल्यामुळेच सिंहासनारुढ पूजा !

आजच्या पूजेमध्ये श्री महालक्ष्मी राजराजेश्वरी या स्वरुपात भक्तांना मनोवांच्छित फल प्रदान करण्यासाठी सिंहासनावर विराजमान आहे. अत्यंत वैभवशाली व प्रसन्न असे हे देवीचे रुप द्विभुज आहे. उजव्या हाताने ती आशीर्वाद व अभय देत आहे, तर डाव्या हातात कमळ आहे. कमळ हे सौंदर्य, ज्ञान आणि पावित्र्य यांचे प्रतीक आहे.

आजची पूजा श्रीपुजक अनिल वी. कुलकर्णी, नारायण (आशुतोष) कुलकर्णी, गजानन मुनिश्वर, श्रीनिवास जोशी यांनी बांधली.

Back to top button