सोलापूर : देशभरातील देवस्थानात केमचे हळद-कुंकू; नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर दररोज 70 टन कुंकवाची निर्यात | पुढारी

सोलापूर : देशभरातील देवस्थानात केमचे हळद-कुंकू; नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर दररोज 70 टन कुंकवाची निर्यात

सोलापूर; अंबादास पोळ : देश-विदेशातील प्रत्येक लहान-मोठ्या मंदिरात पूजेसाठी अत्यावश्यक असणारे कुंकू केममध्ये (ता. करमाळा) उत्पादित केले जाते. सध्या नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर केममधून सुमारे 70 टन कुंकवाची दररोज निर्यात केली जात आहे. या व्यवसायातून येथे दरवर्षी सुमारे 25 कोटींची उलाढाल होते.

नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर कुंकवाच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. केममधील हळद, कुंकू, गुलालाला देशभरातून मागणी आहे. उज्जैन, वाराणसी, अयोध्या, कोलकाताचे कालिका मंदिर, तिरूपती बालाजी, पंढरपूर, तुळजापूर या तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणांहून केमच्या हळद, कुंकू, गुलालास मोठी मागणी असते. केम गावात कुंकू निर्मितीचे 18 ते 20 कारखाने असून या उद्योगाला 200 वर्षांचा इतिहास आहे. या उद्योगामुळे गावातील सुमारे 500-600 कुंटूंबाचा उदरनिर्वाह होतो. केममध्ये तयार केलेल्या हळद आणि कुंकवाची निर्यात काश्मीरपासून कन्या कुमारीपर्यंत होते. तसेच अमेरिका, नेपाळ, मॉरिशस, श्रीलंका या देशातही कुंकू निर्यात केले जाते.

केममध्ये ट्रान्सपोर्ट कंपन्या यायला तयार नाहीत

केम गावाला जाण्या-येण्यासाठी चांगल्या रस्त्यांची सोय नसल्याने या ठिकाणी ट्रान्सपोर्ट कंपन्या यायला तयार नाहीत. तसेच केम ग्रामीण भागात असल्यामुळे भारनियमनाचे चटके सहन करावे लागत आहेत. कधी-कधी 8 ते 9 तास वीज नसते. पूर्वी केमच्या रेल्वे स्टेशनवरून कुंकू भरण्यासाठी पार्सलची सोय होती. भारतात रेल्वेने कोठेही माल पाठविता येत होता. परंतु सध्या रेल्वेने ही सुविधा बंद केली आहे. त्यामुळे व्यापार्‍यांची गैरसोय होत आहे. रेल्वेने ब्रिज लहान केले आहेत. त्यामुळे मालाचे ट्रक येऊ शकत नाहीत. ट्रक दुसर्‍या मार्गांने लांबून आणावे लागतात. त्यामुळे वाहतूक खर्च वाढला आहे. येथे ये-जा करण्यासाठी मुख्य रस्ता नाही, आहेत ते सर्व रस्ते खराब झाले आहेत. त्यामुळे येथे बाहेरच्या ट्रान्सपोर्ट कंपन्या यायला तयार नाहीत. परिणामी येथील व्यापार्‍यांना छोट्या वाहनाद्वारे कुंकू टेंभुर्णी, बार्शी, सोलापूर येथे स्वखर्चाने पाठवावे लागते. हे प्रश्न शासनाने मार्गी लावावेत, अशी मागणी येथील कारखानदारांकडून केली जात आहे.

असे बनते कुंकू

पूर्वी वनस्पतीचा पाला व बोंडं वाळवून तेलामध्ये मिक्स करून कुंकू बनविले जात होते, पण आता कोणी एवढी मेहनत घेत नाही. त्यातच या वनस्पती दुर्मीळ होत गेल्या. त्यामुळे केम येथील एका व्यक्तीने हळदीमध्ये चुना मिक्स करून बैलाच्या घाण्यातून कुंकू बनविण्याचा शोध लावला. पूर्वी दगडाची जाती होती. ती बैलांच्या मदतीने फिरवून हळद, कुंकवाचे मिश्रण दळले जात होते. हळूहळू या उद्योगात बदल होऊन त्याची जागा यांत्रिकीकरणाने घेतली. या उद्योगात क्लोरायझेशन, मिक्सर अशी यंत्रे आली. त्यामुळे कुंकवाचे उत्पादन झपाट्याने वाढले आणि कुंकवाचा दर्जाही सुधारला.

केम येथील कुंकू भारताच्या विविध भागात रेल्वेने पाठविले जात होते. त्यासाठी केमच्या रेल्वे स्टेशनवर गोडावूनची सुविधा केली होती. रेल्वेने कुंकू जात असल्याने माल व्यवस्थित पाहिजे त्या ठिकाणी कमी खर्चात पोहोचत होता, पण रेल्वे विभागाने अचानक ही सुविधा बंद केल्याने गैरसोय होत आहे.

– अरविंद वैद्य, व्यावसायिक

Back to top button