सोलापूर जिल्ह्यात गुटख्याची राजरोस विक्री सुरू | पुढारी

सोलापूर जिल्ह्यात गुटख्याची राजरोस विक्री सुरू

सोलापूर ; अमोल व्यवहारे : राज्यात गुटखा, सुंगधी तंबाखूसारखे आरोग्यास हानीकारक असलेले पदार्थ विक्रीस व बाळगण्यास बंदी असतानाही सोलापूर शहरासह जिल्ह्यात गुटखा, सुगंधी तंबाखूसारखे पदार्थ खुलेआम – राजरोस विक्री सुरू आहे. परराज्यांतयून येणार्‍या छुप्या पध्दतीने या गुटख्याचे अन्न व औषध तसेच पोलिसांच्या कारवायांवरुन समोर आले आहे. पोलिस तसेच अन्न व औषध प्रशासनाकडून गुटखा बाळगणार्‍या व विकणार्‍यांवर कारवाई करुन त्यांच्याकडून कोट्यवधी रुपयांचा गुटख्याचा साठा जप्त केला जात असला तरी शहरातील पानटपर्‍यांवर सहज गुटखा व सुगंधी तंबाखू उपलब्ध होत आहे.

तंबाखूजन्य पदार्थ आरोग्यास हानिकारक असून त्यामुळे जीवघेणे आजारही उद्भवतात. त्यामुळे तरुणांना व्यसनांपासून दूर ठेवून सदृढ समाजाच्या निर्मितीसाठी राज्यात हातभट्टी दारू, गुटखा, मावा आदींच्या विक्रीवर कडक निर्बंध आहेत. मात्र सरकारी यंत्रणांच्या दुर्लक्षामुळे आणि काही भ्रष्ट अधिकारी व कर्मचार्‍यांच्या आश्रयाने हे अवैध व्यवसाय चालत असतात.

गुटखाबंदी नसलेल्या अन्य राज्यांतून तस्करी करून, विविध वाहनांतून गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ महाराष्ट्रात विक्रीसाठी आणले जात असल्याचे कारवायांवरुन दिसून येते. सोलापुरात सन 2021-22 मध्ये गुटखा व इतर तंबाखूजन्य पदार्थांच्या एकूण 138 कारवायांमध्ये सुमारे 150 आरोपींना पकडण्यात आले. 80 दुकाने सील करण्यात येऊन 42 वाहने जप्त करण्यात आली. या कारवाईत प्रशासनाकडून 3 कोटी 94 लाख 90 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

चालू वर्षात एप्रिल 2022 पासून आतापर्यंत 18 कारवाया करण्यात आल्या आहेत. या कारवायांमध्ये 3 दुकाने सील करुन 1 कोटी 60 लाख 92 हजार 862 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. परराज्यांतून तस्करी करुन आणलेला गुटखा, सुगंधी तंबाखूची दरवर्षीची उलाढाल ही कोट्यवधींच्या घरात असल्याचे बोलले जाते.

सोलापूर शहर व जिल्हा गुटखा व अमली पदार्थमुक्त करण्याचा नारा प्र्रशासनाकडून दिला जात असला तरी शहरात अमली पदार्थ व गुटखा तसेच तंबाखूजन्य पदार्थांच्या खरेदी-विक्रीमध्ये वाढ होत असल्याने शहर या व्यसनांपासून मुक्त कधी होणार, असा प्रश्न विचारला जात आहे.

सोलापूर शहराचे तत्कालीन पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी शहरातील पानटपर्‍या, गुटखा माफिया तसेच मावा विकणार्‍यांवर कडक व प्रभावी कारवाई करुन त्यांना जेरीस आणले होते. गेल्या काही महिन्यांपासून कारवाईमध्ये सातत्य राहात नसल्याने गुटखा माफिया पुन्हा जोमाने कामाला लागले आहेत. सोलापूर जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात पोलिसांचे तपासणी नाके असतानाही गुटखा येतोच कसा? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

कारवाई करण्याची अशी ही पद्धत…

गुटखा कारवाई ज्यावेळी करण्यात येते त्यावेळी भारतीय दंड संहितानुसार कलम 328 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येते. भारतीय दंड संहितानुसार कलम 328 अंतर्गत कुणालाही इजा करण्याच्या उद्देशाने मादक किंवा विषारी औषध देणे हा कायद्याने गुन्हा आहे. यामध्ये असे पदार्थ घेणारा आणि विकणारा दोघेही गुन्हेगार ठरतात. या सर्व गोष्टींचा विचार करून महाराष्ट्रात गुटखा, पानमसाला, सुगंधीत तंबाखू, सुगंधीत सुपारी व इतर तत्सम पदार्थांच्या उत्पादन, वाहतूक, विक्री, साठा, वितरण यावर बंदी घालण्यात आलेली आहे. परंतु प्रशासनाकडून कारवाई केल्यानंतर गुटखा आणणार्‍यांवर म्हणजेच वाहनचालकावर कारवाई करण्यात येते. तो गुटखा मागविणारा किंवा पाठविणारा यांच्यावर कारवाई होत नाही.

सोलापुरातदेखील अस्लम व रशीद नावाचे गुटखा माफिया राजरोसपणे शहरात गुटखा आणत असल्याचे कारवायांवरुन दिसून येते. पोलिसांकडील अनेक गुन्ह्यांमध्ये त्यांची नावे समोर आलेली आहेत. पोलिस प्रशासनाकडून अशा गुन्हेगारांवर तडीपार, एमपीडीएअंतर्गत कारवाई करण्यात येते. पोलिसांनी आतापर्यंत शरीराविषयक, मालाविषयक, हातभट्टी, वाळू अशा अवैध धंदेवाल्यांविरोधात कडक प्रतिबंधक कारवाई केली आहे. परंतु गुटखा माफियांविरुध्द एकही कारवाई झालेेली नसल्याचे दिसून येते.

Back to top button